रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प
By हेमंत बावकर | Published: October 22, 2020 04:20 PM2020-10-22T16:20:42+5:302020-10-22T16:22:53+5:30
Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती.
भारताची मोठी फार्मासिटीकल कंपनी डॉ. रेड्डीजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे कंपनीने जगभरातील कारखान्यांमधील काम थांबविले आहे. कंपनीचा डेटा धोक्यात असल्याने सर्व्हरमधील माहिती हल्लेखोरांना न मिळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पुन्हा काम सुरु होईल असे कंपनीने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. या नंतर हा सायबर हल्ला झाल्याने य़ा दृष्टीनेही पाहिले जात आहे. हा सायबर हल्ला झाल्यानंतर बीएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली. डॉ रेड्डीजचा शेअर आता 4832 रुपयांवर आहे. थोड्या वेळाने पुन्हा काहीशी वाढ झाली. दुपारी 1.30 वाजता कंपनीचे शेअर 4985 रुपयांवर आले होते.
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, सायबर हल्ला झाल्याने कंपनीने सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले आहेत. Dr Reddy's चे भारत, रशिया, ब्रिटन, अमेरिकेसह ब्राझीलमध्ये कारखाने आहेत. कंपनीवर हा सायबर हल्ला बुधवारी रात्री 2.30 वाजता झाला आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश राठी म्हणाले की, “सायबर हल्ला झाल्यामुळे, आम्ही आवश्यक माहिती बचाव कार्य म्हणून सर्व डेटा सेंटर वेगळे केले आहेत. आम्हाला आशा आहे की पुढील 24 तासांमध्ये सर्व सेवा सुरू होतील. या घटनेमुळे आमच्या कामावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.''
कोरोना लसीची चाचणी
डॉ. रेड्डीज आणि आरडीआयएफ यांना काही दिवसांपूर्वी भारतात स्पुतनिक व्ही लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. रेड्डीज ही कंपनी हैदराबादची आहे. भारतातील स्पुतनिक व्ही लसच्या दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता प्राप्त झाली आहे. मागील महिन्याच्या सप्टेंबरमध्ये, डॉ. रेड्डीज आणि आरडीआयएफने स्पुतनिक व्ही लसची क्लिनिकल चाचणी आणि त्यास भारतात वितरण करण्याबाबत करार केले होते. भागीदारीचा एक भाग म्हणून, आरडीआयएफ नियामक मान्यतेनंतर डॉ. रेड्डीजची लसीचे 10 कोटी डोस भारतात देणार आहे.