भारतात गेल्या 6 महिन्यांत 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:20 AM2018-11-12T10:20:34+5:302018-11-12T10:57:50+5:30
जानेवारीपासून पहिल्या सहा महिन्यात जवळपास म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सायबर हल्ल्याचे तब्बल 4.36 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत.
नवी दिल्ली - भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर्षी जानेवारीपासून पहिल्या सहा महिन्यात जवळपास म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सायबर हल्ल्याचे तब्बल 4.36 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत. अमेरिकेसह रशिया, चीन आणि नेदरलँड येथून झालेल्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. एफ सेक्युअर या सायबर सुरक्षेसंबंधी संस्थेच्या अहवालामध्ये याबाबत सांगण्यात आले आहे.
एफ सेक्युअरने दिलेल्या अहवालानुसार, रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँडमधून भारतात पहिल्या सहा महिन्यात 4.36 लाख सायबर हल्ले झाले. जगभरातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांची माहिती जमा करण्यासाठी तसेच सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या संस्थेने जगभरात 41 ठिकाणी हनिपॉट्स नेमले आहेत. या हनिपॉट्सनी दिलेल्या आकडेवारीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
रशियातून भारतात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 2,55,589 सायबर हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिकेतून 1,03,458, चीनमधून 42,544, नेदरलँडमधून 19,169 आणि जर्मनीतून 15,330 सायबर हल्ले करण्यात आले आहेत. भारतातून परदेशात केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्याबाबतही यामध्ये माहिती देण्यात आली आहे. भारतातून 35,563 सायबर हल्ले करण्यात आले असून ऑस्ट्रिया, नेदरलँड, ब्रिटन, जपान आणि युक्रेन या देशात ते करण्यात आले आहेत.