‘एम्स’वर सायबर हल्ला, वैद्यकीय क्षेत्रात आजवरची सर्वांत मोठी हॅकिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:34 AM2022-11-26T06:34:56+5:302022-11-26T06:36:26+5:30

यासंदर्भात आतापर्यंत कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून अधिकृत माहिती जारी करण्यात आली नसली तरी, गुन्हेगारांनी डेटा परत करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याचे मानले जात आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 

Cyber attack on AIIMS, biggest ever hacking in medical field | ‘एम्स’वर सायबर हल्ला, वैद्यकीय क्षेत्रात आजवरची सर्वांत मोठी हॅकिंग 

‘एम्स’वर सायबर हल्ला, वैद्यकीय क्षेत्रात आजवरची सर्वांत मोठी हॅकिंग 

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील सर्वांत महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) सर्व्हर हॅक करून सायबर गुन्हेगारांनी चार कोटी रुग्णांचा डेटा चोरला आहे. गेल्या १५ दिवसांपासून संस्थेचे काम जवळपास ठप्प झाले आहे. बहुतांश विभाग मोबाइल फोनच्या डेटाने संगणक चालवीत आहेत. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी हॅकिंग मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये चीनशी संबंधित हॅकर्सचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात आतापर्यंत कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून अधिकृत माहिती जारी करण्यात आली नसली तरी, गुन्हेगारांनी डेटा परत करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याचे मानले जात आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाव्यतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित इतर एजन्सी एम्सच्या यंत्रणेचे रक्षण करण्यात गुंतलेल्या आहेत. माहिती विभाग आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सायबर सुरक्षा पथक या घटनेच्या तपासात गुंतले आहे. दिल्ली पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

रुग्णांचा डेटा चोरीला, ३ दिवसांपासून ऑनलाइन काम बंद -

डेटा परत मिळविण्याचा प्रयत्न
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला एम्स डेटा पुन्हा मिळविण्यासाठी मदत करीत आहे. हल्ला कोणत्या तरी व्यक्तीच्या मेलमध्ये पाठवलेल्या कोड मेसेजद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे आता संस्था त्यांच्या कोणत्याही फाइल्स आणि डेटामध्ये प्रवेश करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

कामकाज पूर्णपणे विस्कळीत
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी सुरक्षेच्या कारणास्तव एम्स लॅन इंटरनेट सर्व्हरही बंद करावे लागले.  त्यामुळे ओपीडीचे काम ठप्प झाले आहे. रुग्णालयाला रुग्णांचे प्रयोगशाळा अहवाल, रुग्णाचा खर्च हा डेटाही मिळू शकत नाही. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा वापरली जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतला आढावा
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा एम्सला भेट दिली आणि डेटा चोरीच्या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींचा आढावा घेतला. केंद्र सरकारने देशातील सर्व प्रतिष्ठित संस्थांना फायरवॉल मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृत संगणकावर वैयक्तिक ई-मेल वापरू नका, असे आदेश दिले आहेत.

दिग्गजांचा डेटाही गेला?
‘एम्स’चा डेटा आठ वर्षांपूर्वी पूर्णपणे डिजिटल करण्यात आला होता. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींसह अनेक माजी पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी मान्यवरांवर एम्समध्ये उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचा वैयक्तिक डेटा एम्सच्या सर्व्हरवरून चोरीला गेला असण्याची शक्यता आहे.

पेपरलेस मोहिमेला झटका
एम्सने एक महिन्यापूर्वीच १ जानेवारी २०२३ पासून रुग्णालयाचे कामकाज पेपरलेस होईल आणि एप्रिल २०२३ पासून ते पूर्णपणे डिजिटल होईल, अशी घोषणा केली होती. दुसरीकडे, केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड बनवून देशातील सर्व लोकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती नॅशनल डेटा बँकेत ठेवण्याची तयारी केली आहे. हा सायबर हल्ला या मोहिमांना मोठा धक्का मानला जात आहे.


 

Web Title: Cyber attack on AIIMS, biggest ever hacking in medical field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.