नुपूर शर्मा वादानंतर भारतावर सायबर हल्ले, 2000हून अधिक वेबसाइट हॅक; क्राइम ब्रँचची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:48 PM2022-07-08T17:48:14+5:302022-07-08T17:48:27+5:30
मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्स ग्रुपने भारतावर सायबर हल्ले सुरू केले आहेत. अहमदाबाद क्राइम ब्रँचने याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबरांवरील वक्तव्यानंतर मोठा वाद झाला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने म्हटले की, नुपूर शर्माच्या घटनेनंतर मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्सनी भारताविरुद्ध सायबर हल्ले सुरू केले आहेत.
ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या दोन हॅकर गटाकडून हे हल्ले होत आहेत. दोन्ही गटांनी जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ला करण्याचे आवाहनही केले आहे. अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने सांगितले की, या हॅकर्स ग्रुपने भारतातील 2 हजारांहून अधिक वेबसाइट हॅक केल्या आहेत.
अनेक माहिती ऑनलाईन लीक झाली
हॅकर्सनी नुपूर शर्माचे घर आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन टाकली. याशिवाय आसाममधील एका प्रादेशिक वाहिनीवर थेट प्रक्षेपणाच्या मध्यभागी पाकिस्तानचा ध्वज दाखवण्यात आला. हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक केली. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश पोलिसांची वैयक्तिक माहितीही देण्यात आली. लोकांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड ऑनलाईन लीक झाले.
सायबर क्राईमने मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिले
अहमदाबाद सायबर क्राइमने यासंदर्भात मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात अहमदाबाद सायबर क्राईमने दोन्ही गटांसाठी इंटरपोल लुकआउट नोटिसचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. उदयपूरमध्ये एका शिंप्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. याशिवाय अरब देशांमध्येही मोठा विरोध पाहायला मिळाला. अरब देशांमध्येही अनेक ठिकाणी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या आल्या.
नुपूर शर्मावर देशातील अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखल
वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत म्हटले आहे की, नुपूरवर दाखल झालेले गुन्हे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, ते सर्व एकत्र दिल्लीला वर्ग करण्यात यावे. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावत नुपूरवर जोरदार टिप्पणी केली.