मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:15 IST2025-04-17T17:05:51+5:302025-04-17T17:15:02+5:30
बिहारमधल्या आमदाराला मुंबई पोलिसांच्या नावाने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
Bihar MLC Digital Arrest: देशभरात सायबर गुन्हेगार केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर प्रतिष्ठित लोकांनाही त्यांच्या फसवणुकीचे बळी बनवत आहेत. सायबर गुन्हेगारांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) विधान परिषदेचे सदस्य मोहम्मद शोएब यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवले. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून, मनी लाँड्रिंगच्या बहाण्याने शोएब यांना १२ तासांसाठी डिजिटल अरेस्ट करण्यात आले. शोएब यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी ताबडतोब सायबर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ९ एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यात आली.
राजदचे विधान परिषदेचे सदस्य मोहम्मद शोएब यांना सायबर गुन्हेगारांनी १२ तास डिजिटली अरेस्ट करुन त्यांचा छळ केला. गुन्हेगारांनी त्यांच्याशी संबंधित आर्थिक तपशीलांची संपूर्ण माहिती तपासली. या काळात आमदार मोहम्मद शोएब घराबाहेर पडले नाहीत. सायबर गुन्हेगारांनी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे एका खोलीत बसवून ठेवले होते. ८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता शोएब यांना दोन फोन नंबरवरून कॉल आले आणि कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख सायबर क्राइम मुंबई युनिटचा अधिकारी म्हणून करून दिली होती.
"तक्रार मिळाल्यानंतर, सायबर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ९ एप्रिल रोजी विधान परिषदेचे सदस्यांनी एक लेखी तक्रार दिली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की त्यांना सायबर गुन्हेगारांनी १२ तास डिजिटल अरेस्ट केले होते. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारांची संपूर्ण माहिती मिळाली आहे," असे सायबर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राघवेंद्र त्रिपाठी यांनी म्हटलं.
तक्रारीनुसार, ८ एप्रिल रोजी मोहम्मद शोएब यांना ६४८३०८५०७०२ आणि ७८६६८६५७८४ या क्रमांकांवरून फोन आले होते. कॉल करणाऱ्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी आहे असे सांगितले होते. यानंतर फोन करणाऱ्याने शोएब यांना सांगितले की, तुमच्या कॅनरा बँकेच्या मुंबई शाखेतील खात्यातून कोट्यवधी लोकांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन बेकायदेशीर कृत्य करण्यात आले आहे. यामुळे तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा केस नंबर ५६२१/२०२५ आहे. या संदर्भात तुमची चौकशी करणे आवश्यक आहे. यानंतर, गुन्हेगाराने व्हिडिओ कॉल केला आणि वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडले.