सायबर, लेझर, स्पेस आणि रोबो; लष्करप्रमुखांनी सांगितली भविष्यामधील युद्धातील अस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:41 PM2019-10-15T12:41:00+5:302019-10-15T12:42:04+5:30
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत.
नवी दिल्ली - विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशाचे लष्करप्रमुख बीपीन रावत यांनी डीआरडीओमधील एका कार्यक्रमात बोलताना भविष्यातील संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कराकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. ''आता आमची नजर भविष्यातील युद्धात उपयुक्त ठरेल, अशी प्रणाली विकसित करण्यावर आहे,'' असे रावत यांनी सांगितले.
बीपीन रावत म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सायबर, स्पेस, लेझर, इलेक्ट्रॉनिक आणि रोबोटिक टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. डीआरडीओने देशासाठी खूप असे काम केले आहे, ज्यामुळे लष्कराला खूप फायदा झाला आहे.''
''आता आम्ही यापुढे जेव्हा कधी पुढील लढाई लढू तेव्हा त्यात विजयी ठरू, याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा विजय स्वदेशी हत्यारांच्या बळावर मिळेल,'' असेही लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्दा तंत्रज्ञानावर आघारित होणाऱ्या भविष्यातील लढायांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाला तयार राहावे लागेल, असे वारंवार सांगितले आहे.
यावेळी नौदलप्रमुख कमरबीर सिंह यांनी सांगितले की, ''आता आपल्याला तीन बाबतीं काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. आपल्याल तंत्रज्ञानाचा खूप वापर करावा लागेल. सोबतच अमेरिका कशाप्रकारे आगेकूच करत आहे, कुठल्या प्रकल्पांवर काम करत आहे त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्याबरोबरच डीआरडीओने लवकर तयार होऊ शकतील, अशी छोटी शस्त्रास्त्रे विकसित करावीत.''