सायकल गर्ल ज्योती पासवानवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:12 PM2021-05-31T14:12:38+5:302021-05-31T14:18:11+5:30
Cycle Girl Jyoti Paswan: सायकल गर्ल म्हणून देशपातळीवर ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
पाटणा - सायकल गर्ल म्हणून देशपातळीवर ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिच्या वडलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गतवर्षी लॉकडाऊनला सुरुवात झाल्यावर वडलांना सायकलवर बसवून गुडगांवमधून बिहामधील दरभंगा येथे आणले होते. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेल आली होती. (Cycle Girl Jyoti Paswan's father dies of heart attack)
गतवर्षी कडक लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची भीती आणि रोजगार गमावल्यामुळे लाखो लोकांनी शहरातून गावाच्या दिशेने पलायन करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ज्योतीचाही समावेश होता. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडामधील सिरहुल्ली गावातील १३ वर्षीय ज्योतीने लॉकडाऊनदरम्यान वडील मोहन पासवान यांना सायकलवर बसवून गुडगांव येथून आठ दिवसांचा प्रवास करून दरभंगा येथे आणले होते.
ज्योतीचे वडील मोहन पासवान यांच्या काकांचे निधन १० दिवसांपूर्वी झाले होते. त्यांचे श्राद्ध कार्य करण्याबाबत बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर उठून उभे राहत असतानाच मोहन पासवान कोसळले आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. मोहन पासवान यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये मोहन पासवान हे ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा अपघात झाला होता. तेव्हा ज्योती त्यांची देखभाल करण्यासाठी वडलांकडे आली होती. यादरम्यान, संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हा केवळ ४०० रुपयांना एक सायकल खरेदी करून ज्योती हिने तिच्या वडिलांना गुडगांव येथून दरभंगा येथे आणले होते.