Cyclone Amphan : ‘अॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:53 AM2020-05-22T03:53:41+5:302020-05-22T05:59:12+5:30
हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला.
कोलकाता/भुवनेश्वर : ताशी १९५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासोबत धडकलेल्या ‘अॅम्फन’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये ७२ लोकांचा बळी घेत भयानक धूळधाण केली. हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला. वेगवान वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाले असून मातीची घरे आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभी झाडे आणि विजेचे खांब उखडून पडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या हानीची हवाई पाहणी करणार आहेत.
पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा हे दोन जिल्हे अॅम्फन चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. ओडिशातील किनारपट्टीवरील अनेक भागांत वीज आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ओडिशातील जवळपास ४४ लाखांहून अधिक लोकांना तडाखा बसला आहे. प. बंगाल आणि ओडिशात धूळधाण करणाºया या चक्रीवादळाने बांगलादेशातही १० लोक ठार झाले असून बांगलादेशातील किनारपट्टीवरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
उत्तर आणि दक्षिण २४ परगणा तसेच कोलकाता बुधवारी सायंकाळपासून अंधारात आहे. दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही ठप्प आहे. यावेळी चक्रीवादळाने तडाख्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केली.
अॅम्फन चक्रीवादळग्रस्त राज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा आश्वासक शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये मी पाहिली आहेत. ही आव्हानात्मक घडी आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी आहे, असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशातील बचाव व मदत कार्याचा राष्टÑीय संकट व्यवस्थापन समितीने दिल्लीतील बैठकीत आढावा घेतला. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशा ओळखून भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज केल्याने वेळीच या दोन्ही राज्यांतील किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आल्याने नुकसान कमी झाले.
कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेळीच एनडीआरएफची पथके तैनात करून या दोन्ही राज्यांतील जवळपास ७ लाख लोकांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यामुळे १९९९ मधील महाचक्रीवादळाच्या तडाख्याच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. जलदगतीने पुनर्वसन करण्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त पथके पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकाताकडे रवाना झाली आहेत.
चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मी माझ्या आयुष्यात एवढे भयानक चक्रीवादळ आणि विध्वंस पाहिला नव्हता. केंद्राने राज्याला सर्वतोपरी मदत करावी. चक्रीवादळग्रस्त भागाचा मी लवकरच दौरा करणार आहे. या भागात पुनर्वसनाचे कामही सुरू केले जाईल. - ममता बॅनर्जी