Cyclone Asani: असानी चक्रिवादळाने मार्ग बदलला, आंध्रच्या दिशेने मोर्चा वळवला, या भागांसाठी रेड अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 08:11 PM2022-05-10T20:11:40+5:302022-05-10T20:12:30+5:30
Cyclone Asani: पूर्व किनाऱ्यावर घोंघावत असलेल्या असानी चक्रिवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने मंगळवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. असानी चक्रिवादळाने आपला रस्ता बदलला असून, ते आता काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - पूर्व किनाऱ्यावर घोंघावत असलेल्या असानी चक्रिवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने मंगळवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. असानी चक्रिवादळाने आपला रस्ता बदलला असून, ते आता काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच विभागाने आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागांसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना चक्रिवादळाशी संबंधित आपत्तींना रोखण्यासाठी कारवाई करावी लागणार आहे.
आयएमडीने सांगितले की, चक्रिवादळाची गती सकाळी पाच वाजता प्रतितास २५ किमी होती. ती दुपारी सुमारे ४.३० च्या सुमारास आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथून सुमारे २१० किमी दक्षिण-दक्षिण पूर्वेला आणि ओदिशामधील गोपालपूर येथून ५१० किमी दक्षिण-पश्चिममध्ये केंद्रित होते.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, प्रचंड चक्रिवादळ बुधवारी कमकुवत होऊन चक्रिवादळामध्ये बदलेल आणि गुरुवारी दाबाच्या पट्ट्यामध्ये परिवर्तित होईल. भुवनेश्वर प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राचे निर्देशक एच. आर. विश्वास यांनी सांगितले की, भीषण चक्रिवादळ आता कमकुवत होऊ लागले आहे. त्यांनी सांगितले की, वेगवान हवांची गती मंगळवारी रात्रीपर्यंत घटून ८० ते ९० किमी आणि बुधवारी संध्याकाळपर्यंत ६० ते ७० किमीपर्यंत कमी होईल.
हवामान विभागाने मच्छिमारांना गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे चक्रिवादळामुळे आपल्या अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे खबरदारी म्हणून विविध पावले उचलली आहेत. तसेच राज्य सरकार आणि आयएमडीसोबत समन्वय ठेवला आहे.