Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:21 AM2019-05-03T09:21:06+5:302019-05-03T09:30:22+5:30

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

Cyclone Fani churns toward India, prompting evacuation of almost 1 million | Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

googlenewsNext
ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील किमान 10 हजार गावे आणि 52 शहरांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून 11.50 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.

भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ 170 ते 200 किलोमीटर प्रतितास वेगानं ओडिशाला धडकणार आहे. ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 11 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती असल्याने पुरी, गंजम, गजपती, खुर्दा, जगतसिंहपूर, केंद्रापारा, भाद्रक, जाजपूर, बालासोरा आदी जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील किमान 10 हजार गावे आणि 52 शहरांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून 11.50 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. निवारा सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 81 पथके सज्ज झाली आहेत. आंध्र प्रदेशामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 



विमानसेवेवरही फनी चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून भुवनेश्वरचे विमानतळ बंद केले आहे तर शुक्रवारी सकाळपासून कोलकाता विमानतळ बंद केले जाणार आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीवर नागरी उड्डाण मंत्रालय लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.



फनी वादळाला फोनी असं देखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 




200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द

भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वेगाने सरकत असलेले 'फनी' चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत ओडिशातील दक्षिण पुरीच्या गोपालपूर आणि चांदबली भागात धडकण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) बुधवारी (1 मे) स्पष्ट केली आहे. फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या या आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जातात. 





पाटणा-एर्नाकुलम एक्सप्रेस, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस, हावडा-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-हैदराबाद ईस्ट कोस्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर-रामेश्वरम एक्सप्रेस, मुझफ्फरपूर-यशवंतपुर एक्सप्रेस, पुरी-आनंद विहार टर्मिनल नीलांचल एक्सप्रेस आणि पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्सप्रेस या गाड्या फनी चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर, पुरी येथे जाणाऱ्या सर्व गाड्या या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुरी येथून हावडा पर्यंत जाणारी गाडी तसेच हावडा येथून बंगळुरू, चेन्नई आणि सिकंदराबादपर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि पुरी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्या 3 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 




अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ताशी 205 कि.मी. वेगाने तसेच 175-185 कि.मी. ताशी चक्राकार गतीने वारे वाहत असून, शुक्रवारी 3 मे रोजी दक्षिण पुरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती एनडीएमएने हवामान खात्याच्या बुलेटिनच्या हवाल्याने दिली आहे.




आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 45 कि.मी. राहण्याची शक्यता आहे. काही स्थानांवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची(एनडीआरएफ)मदत चमू तसेच नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर्स तैनात असतील.


आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक
मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पहिल्या बैठकीतील निर्णयाच्या आधारावर व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक आणि मदत योजनेंतर्गत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगालसाठी 1086 कोटींची मदत जारी केली आहे.


पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा आदेश
फनी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. ओडिशातील संपूर्ण शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येतील. हवामान विभागाने ओडिशा किनारपट्टी भागात ‘यलो वॉर्निंग’ जारी केल्यानंतर रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्थगित किंवा वळती करण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. किनारपट्टी भागात मासेमारी थांबविण्यात आली असून, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.


एनडीआरएफच्या 41 चमूंची तैनाती
आंध्र प्रदेश (8), ओडिशा(28), प. बंगाल (5) अशा 41 चमू एनडीआरएफ तैनात करणार असून, प. बंगालसाठी 13 तर आंध्र प्रदेशसाठी 10 चमू राखीव असतील. एका चमूत 45 जवान असतील.
 

Web Title: Cyclone Fani churns toward India, prompting evacuation of almost 1 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.