Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 09:04 AM2019-05-06T09:04:08+5:302019-05-06T09:14:55+5:30

फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत.

Cyclone Fani CM Patnaik announces three-pronged plan for affected districts | Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू

Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू

Next
ठळक मुद्दे फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत.पुरीतील सर्व कुटुंबांना आणि खुर्दा जिल्ह्यातील ज्या भागांना फनी चक्रीवादळाचा जास्त फटका बसला आहे, तेथील कुटुंबांना 50 किलो तांदूळ, 2 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. वीज पूरवठा खंडीत झाला आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदतीची घोषणा केली आहे. पुरीतील सर्व कुटुंबांना आणि खुर्दा जिल्ह्यातील ज्या भागांना फनी चक्रीवादळाचा जास्त फटका बसला आहे, तेथील कुटुंबांना (अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण असल्यास) 50 किलो तांदूळ, 2 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे. तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी  95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.

 


वादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या पुरी शहरातील 70 टक्के भागांमध्ये आणि राजधानी भुवनेश्वरमधील 40 टक्के भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे पटनायक यांनी सांगितले. पुढील 15 दिवस अन्न मोफत पुरवण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. याशिवाय वृक्षारोपणाची मोहीमही मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प. बंगालच्या अनेक भागांत या वादळाचा प्रभाव जाणवला. खडगपूर, ईस्ट मिदनापूर, मुर्शिदाबाद, नॉर्थ 24 परगना आणि दिगा सारख्या भागांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. तसेच 90 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं वारे वाहत आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत. तसेच सकाळी 8 वाजेपर्यंत कोलकात्यातील विमानतळ सेवा बंद करण्यात आली आहे. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने 30 हून अधिक जणांचा बळी घेतला.


पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार 1000 कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी 3 ते शनिवारी सकाळी 8 पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याशिवाय सुमारे 300 हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.


12 लाख लोक सुरक्षित ठिकाणी

प्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी 8 वाजता पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने 12 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी 175 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे 200 किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.

Cyclone Fani : मी मदत केली, तुम्हीही करा; बिग बीचं देशवासीयांना आवाहन

अमिताभ बच्चन यांनी ओडिशातील लोकांना मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. फनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना त्यांनी मदत केली आहे. तसेच 'मी मदत केली, तुम्हीही करा' असं सांगून देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. 'चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान, हर तूफ़ान से लड़ेंगे हम, न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम, जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम' असं बिग बींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याआधीही अमिताभ बच्चन यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत केली होती. ओडिशामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता फनी हे वादळ पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टीला जाऊन धडकलं आहे. 


पंतप्रधान मोदींचा कॉल घेण्यास ममता बॅनर्जींचा नकार, प. बंगालमध्ये राजकीय 'वादळ'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन संवाद साधण्याचे टाळल्याचे वृत्त होते. त्यानंतर, नवीन माहिती पुढे आली. ममता बॅनर्जी यांनीच पीएमओमधून आलेला कॉल घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. फनी वादळासंदर्भात ममता यांना पीएमओकडून फोन करण्यात आला होता. मात्र, ममतांनी बोलण्यास नकार दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील फोनी वादळासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममत यांनीच फोन घेण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली. 

 

Web Title: Cyclone Fani CM Patnaik announces three-pronged plan for affected districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.