Cyclone Fani : ओडिशामध्ये फनीचा तडाखा; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:08 AM2019-05-13T10:08:13+5:302019-05-13T10:08:47+5:30
ओडिशामध्ये मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या फनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पुरी - ओडिशामध्ये मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या फनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 3 मे रोजी ओडिशा येथे 240 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चक्रीवादळात जवळपास 241 जण जखमी झाले आहेत. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 वर होता तो वाढून आता 64 झाला आहे. पुरी जिल्ह्याशिवाय खुर्दा जिल्ह्यात 9 जण, कटक जिल्ह्यात 6, मयूरभंजमध्ये 4, केंद्रपाडा आणि जाजपुर येथे प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
ओडिशामध्ये 1999 मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये राज्यातील 10 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याआधी 2018मध्ये आलेल्या तितली वादळात 60 लोकांचा मृत्यू झाला होता तर 2013मधील फालिन वादळात 44 लोकांचा मृत्यू झाला होता. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 1 हजार कोटींची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती. त्याचसोबत मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं. तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी फनी चक्रीवादळामुळे ज्या लोकांची घरं उद्धवस्त झाली आहेत अशा लोकांना पक्की घरे देण्याची घोषणा केली आहे.
फनी वादळाचा तडाखा ओडिशा येथील 11 जिल्ह्यातील 14, 835 गावांना बसला आहे. मागील 24 तासात 13.41 लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती पाहता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रभावित झालेल्या लोकांना विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे. तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी 95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.
12 लाख लोक सुरक्षित ठिकाणी
प्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी 8 वाजता पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने 12 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी 175 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे 200 किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.