गुजरात, राजस्थानकडे चक्रीवादळाची कूच! मुंबईला अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 10:25 AM2023-06-13T10:25:50+5:302023-06-13T10:25:57+5:30
पंतप्रधानांकडून आढावा; १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
नवी दिल्ली : बिपोरजॉय चक्रीवादळाची वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने होत होती; पण आता ते गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. सध्या हे वादळ पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर असून, ते १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळाचा मार्ग बदलल्यानंतर एसडीआरएफच्या टीमने गुजरातच्या किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र, कच्छसह १० जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या सोमवारी दुपारी १२ वाजताच्या अपडेटनुसार, सकाळी साडेआठ वाजता वादळ गुजरातच्या पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर होते. द्वारका येथून आतापर्यंत सुमारे १३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चक्रीवादळाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला.
तब्बल १० दिवस छळणार
- चक्रीवादळाचा प्रभाव १० दिवस टिकू शकतो. अलीकडच्या काळातील हे सर्वाधिक काळ टिकणारे वादळ
- गुजरातमधील कच्छ, राजकोट, भावनगर, पोरबंदर, गीर-सोमनाथ, द्वारका, जाखौ, जाफ्राबादमध्ये सतर्कतेचा इशारा.
- वलसाडमध्ये दक्षता म्हणून सागरी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
- कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू.
- गुजरातमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुटी.
- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या सभा भाजपकडून १५ जूनपर्यंत रद्द.
पाकिस्तानातही पूर्वतयारी: बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दक्षिण सिंध प्रांतातील सखल किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.