मिचाँग चक्रीवादळाचा तामिळनाडू, आंध्र प्रदेशात कहर; चेन्नईत ५ जणांचा मृत्यू, अनेक उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:40 AM2023-12-05T07:40:08+5:302023-12-05T07:40:23+5:30
Cyclone Michaung: गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिचाँग चक्रीवादळ देशाच्या दक्षिणेकडील राज्ये तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर करत आहे. चेन्नईत वादळ आणि मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिचाँग चक्रीवादळ येत्या २४ तासांत धडकण्याची (लँडफॉल) शक्यता असल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हाय अलर्टवर आहेत. चेन्नईने आधीच शाळा बंद केल्या आहेत. किनारी भाग ओसाड झाला आहे. तामिळनाडूला पावसाचा तडाखा बसेल, तर आंध्र प्रदेशात कहर होईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
Cyclone Michaung: Landfall likely between Andhra's Nellore and Machilipatnam today
— ANI Digital (@ani_digital) December 4, 2023
Read @ANI Story | https://t.co/L9U9z5xSzi#CycloneMichuang#AndraPradesh#Machilipatnampic.twitter.com/Iky9dVyyBk
चक्रीवादळ आज बापटला किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना मदत उपाययोजना करण्यासाठी हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा या ८ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
चेन्नईतील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे ओमंडुरार शासकीय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाहेरील वालजाह रोड, माउंट रोड, अण्णा सलाई, चेपॉकसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या लोकप्रिय मरीना बीचला पूर आला होता आणि माउंट रोड ते मरीना बीचपर्यंतचे रस्ते पाणी साचल्यामुळे ब्लॉक झाले होते.
नेमका काय झाला परिणाम?
पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचल्याने कामकाज सोमवारी सकाळपासून थांबले असून मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. १२ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, एका खासगी वाहकाने दुबई आणि श्रीलंकेच्या विमानासह चार आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केल्या आहेत, तर तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंगळुरूला वळवण्यात आली. रेल्वेने तामिळनाडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकूण २०४ गाड्या रद्द केल्या आहेत.