तिरुपतीमध्ये पर्यटक अडकले, सर्वाधिक महाराष्ट्रातील; मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:53 PM2023-12-05T12:53:11+5:302023-12-05T13:04:30+5:30
Cyclone Michaung: रेल्वेने तामिळनाडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकूण २०४ गाड्या रद्द केल्या आहेत.
मिचाँग चक्रीवादळ देशाच्या दक्षिणेकडील राज्ये तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात कहर करत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे. तर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा या ८ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याचदरम्यान तिरुपतीमध्ये अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर येत आहे.
रेल्वेने तामिळनाडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकूण २०४ गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे अनेक पर्यटक तिरुपतीमध्ये अडकले आहे. अडकलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे. चक्रीवादळ आज बापटला किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना मदत उपाययोजना करण्यासाठी हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले.
#WATCH | Tamil Nadu: Several parts of Chennai witness severe waterlogging due to incessant rainfall
— ANI (@ANI) December 5, 2023
(Visuals from Vadapalani and Arumbakkam areas) pic.twitter.com/effKepeXrX
नेमका काय झाला परिणाम?
पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचल्याने कामकाज सोमवारी सकाळपासून थांबले असून मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. १२ देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, एका खासगी वाहकाने दुबई आणि श्रीलंकेच्या विमानासह चार आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केल्या आहेत, तर तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंगळुरूला वळवण्यात आली.