रेमल चक्रीवादळाचा तडाखा, मध्यरात्रीनंतर केला विनाश; १० ठार, दीड लाख लाेक विजेविना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:12 AM2024-05-28T10:12:42+5:302024-05-28T10:15:03+5:30
बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे शेकडो घरांचे नुकसान
कोलकाता/ढाका: बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर १२० किमी प्रतितास वेगाने धडकलेल्या चक्रीवादळ ‘रेमल’ने रविवारी मध्यरात्रीनंतर मोठा विनाश केला. बांगलादेशात शेकडो गावे पाण्याखाली गेल्याने किमान सात जण ठार झाले, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका सुमारे दीड लाख लोकांना बसला. प. बंगालमध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला, तर घरांचे मोठे नुकसान झाले आणि १५ हजार वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. विमान आणि रेल्वेसेवाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.
‘रेमल’ सोमवारी सकाळी कमकुवत झाले. वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बांगलादेशातील अनेक भागांना बसला. ग्रामीण वीज प्राधिकरणाने ‘रेमल’चे नुकसान कमी करण्यासाठी किनारपट्टी भागातील दीड लाख लोकांची वीज खंडित केली होती. काही भागांत १२ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाली. २१ तासांनंतर कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा सुरू झाली.
पश्चिम बंगालमध्ये शेकडाे घरांचे नुकसान
- पश्चिम बंगालमधील रेमल चक्रीवादळामुळे २४ गट आणि ७९ नगरपालिका प्रभागांमधील सुमारे १५ हजार घरांचे नुकसान झाले. जास्त नुकसान दक्षिणेकडील किनारपट्टी भागात झाले.
- राज्याच्या विविध भागांत किमान २,१४० झाडे उन्मळून पडली आणि ३३७ वीज खांबही पडले. प्रशासनाने २ लाख ७ हजार ६० लोकांना १,४३८ सुरक्षित निवारागृहांमध्ये हलवले.
अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्याने १८ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सास, ओक्लाहोमा, अराकान्सास या भागांमध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे दोन बालकांसहित १८ जणांचा मृत्यू झाला. तुफानी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही घरे उद्ध्वस्त झाली तर काहींची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. चक्रीवादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यामुळे विद्युतपुरवठा बंद होऊन अंधाराचे साम्राज्य पसरले.
टेक्सासमधील कुकी काऊंटी येथे शनिवारी रात्रीपासून घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे सात जणांचा मृत्यू झाला. कुक काऊंटीचे शेरीफ म्हणाले की, चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने दोन बालकांसहित पाच जणांचा मृत्यू झाला.