Cyclone Titli Updates: 10 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणाऱ्या 'तितली'चा ओडिशा, आंध्र प्रदेशला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:07 PM2018-10-10T17:07:11+5:302018-10-10T17:08:53+5:30
बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे.
नवी दिल्ली- बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिना-याच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत असून, ओडिशाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितासच्या वेगानं पुढे सरकत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापत्तनमच्या समुद्रकिना-यांवर धडकण्याची शक्यता आहे.
तितली हे चक्रीवादळ भयंकर असून, ओडिशातल्या गोपाळपूरपासून हे चक्रीवादळ 370 किमी दूर आहे. बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच 5 दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी 110 किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना 74 किलोमीटरपेक्षा अधिक दूर न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. एरव्ही 9 ऑक्टोबरपर्यंत हा इशारा मर्यादित होता. परंतु प्राप्त परिस्थितीत चक्रीवादळाची वाढलेली गती लक्षात घेता हा इशारा 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.