Cyclone Yaas: १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:30 AM2021-05-29T06:30:27+5:302021-05-29T06:31:44+5:30
Cyclone Yaas: ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिसराची शुक्रवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले.
कोलकाता : ‘यास’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिसराची शुक्रवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींचे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. यातील ५०० कोटी अधिक नुकसान झालेल्या ओडिशाला तर उर्वरित ५०० कोटी पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांना दिले जाणार आहेत.
या संकटाच्या प्रसंगात नुकसानग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करेल, अशी ग्वाही या वेळी पंतप्रधानांनी दिली. वादळात जीव गमावलेल्या कुटुंबीयांसाठी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. वादळात मरण पावलेल्यांच्या वारसांना २ लाख तर जखमी झालेल्यांना त्यांनी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या वेळी पंतप्रधान म्हणाले, अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात वादळे येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा आपत्तींचा सामना करताना आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल.
बैठकीसाठी न थांबताच ममता निघून गेल्या
पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थांबल्या नाहीत. कलाईकुंडा येथे पंतप्रधानांची १५ मिनिटे भेट घेतल्यानंतर त्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेल्या. त्या म्हणाल्या बैठकीबाबत आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली नव्हती.
मी त्यांना अहवाल देऊन राज्याला २० हजार कोटींची गरज असल्याचे सांगितले. त्यांची परवानगी घेऊन मी तेथून निघाले. राज्यपाल जगदीप धनखड यांनी यावर म्हटले आहे की, ममता यांचे हे कृत्य कायद्याला धरून नाही.