चक्रीवादळ ‘यास’ आज होणार अधिक सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:40 AM2021-05-24T07:40:23+5:302021-05-24T07:41:14+5:30

cyclone yaas Update: हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओदिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते.  

cyclone yaas will be more active today | चक्रीवादळ ‘यास’ आज होणार अधिक सक्रिय

चक्रीवादळ ‘यास’ आज होणार अधिक सक्रिय

Next

पुणे : अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार झाले असून त्याचे सोमवारी सकाळी ‘यास’ चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी ते पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओदिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते.  सोमवारी सकाळी या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘यास’ चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर पुढील २४ तासात त्याचे स्वरूप तीव्र होणार आहे. २६ मे रोजी त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ते पश्चिम बंगालमधील सागर आणि ओडिशाच्या पारादीप दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर बिहार, झारखंडपर्यंत त्याचा प्रवास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अंदमान समुद्रात आगमन झालेला मॉन्सून आज रविवारी तेथेच स्थिरावला आहे. आज त्याची पुढे वाटचाल झाली नाही.

मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता
मराठवाडा व लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवात आता विरून गेला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी पडत आहेत. पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात २४ व २५ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: cyclone yaas will be more active today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.