सायरस मिस्त्रींनी टाटांविरोधात केल्या कॅव्हेट दाखल
By admin | Published: October 25, 2016 05:16 PM2016-10-25T17:16:26+5:302016-10-25T19:17:38+5:30
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर आता सायरस मिस्त्रींनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये रतन टाटा आणि टाटा समूह आणि टाटा ट्रस्टविरोधात चार केविएट दाखल केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर आता सायरस मिस्त्रींनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये रतन टाटा आणि टाटा समूह आणि टाटा ट्रस्टविरोधात चार कॅव्हेट दाखल केल्या आहेत, असं वृत्त द फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलं आहे. सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर ते या निर्णयाविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून काल समोर आली होती. त्यानंतर आज त्यांनी टाटा समूहाविरोधात कॅव्हेट दाखल केल्या आहेत.
सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्समध्ये चार वर्षांहून कमी कार्यकाळ अनुभवला आहे. सायरस मिस्त्रींना पदावरून दूर केल्यानंतर याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले.
(सायरस मिस्त्री देणार होते रतन टाटांचा बळी)
दरम्यान टाटा सन्समध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त करण्यासंदर्भात आज टाटा समूहाच्या विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत रतन टाटा यांची बैठक झाली. बैठकीत रतन टाटांनी सर्व सीईओंना कंपन्यांच्या कामकाजावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला असून, शेअर होल्डर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्याही सूचना केल्या आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची तुम्ही चिंता करू नका, असंही रतन टाटांनी या बैठकीत सांगितलं आहे.