सायरस मिस्त्रींना ‘टाटा’

By admin | Published: October 25, 2016 05:17 AM2016-10-25T05:17:08+5:302016-10-25T07:01:08+5:30

मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य आणि शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही महिन्यांपूर्वी दिली गेली त्या टाटा समूहाच्या अध्यक्षास सोमवारी अचानक समूहानेच ‘टाटा’ केला.

Cyrus Mistry to 'Tata' | सायरस मिस्त्रींना ‘टाटा’

सायरस मिस्त्रींना ‘टाटा’

Next

मुंबई : मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही महिन्यांपूर्वी दिली गेली त्या टाटा समूहाच्या अध्यक्षास सोमवारी अचानक समूहानेच ‘टाटा’ केला. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली. नव्या चेअरमनची निवड करण्यासाठी रतन टाटा यांच्यासह ५ जणांची सर्च टीम तयार करण्यात आली असून, नवा चेअरमन मिळेपर्यंत चार वर्षांनी पुन्हा एकदा रतन टाटा यांनी समूहाची धुरा आपल्या हाती घेतली.

04/07/1968 रोजी जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज आॅफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, असे बोलले जात आहे.

नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.

2006 मध्ये त्यांनी टाटाच्या संचालक मंडळात प्रवेश मिळविला होता. मिस्त्री यांना टाटामधील सर्वाधिक समभाग असलेल्या शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून चेअरमन करण्यात आले होते.

का घडले असावे असे
टाटा स्टीलचा ब्रिटनमधील व्यवसाय विकण्याचा सर्वांत कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला. टाटा डोकोमो फुटल्यानंतर जपानच्या डोकोमोसोबत कंपनीचा न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णयही असाच कठीण होता.
टाटाच्या अंतर्गत नियतकालिकात अलीकडेच त्यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. योग्य कारणांसाठी कठोर निर्णय घ्यायला कंपनीने घाबरायला नको, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
त्यांच्या या विचारांना कंपनीच्या अडचणीतील काही व्यावसाय शाखांतून प्रखर विरोध झाला होता. त्यांच्या कार्यकाळात कंपनी पुढे जाण्याऐवजी मागे गेली, असा ठपका त्यांच्यावर आला होता.

2015-16 या आर्थिक वर्षातील टाटा सन्सचे उत्पन्न १०८ बिलियन डॉलरवरून घसरून १०३ बिलियन डॉलर एवढे झाले आहे.

2016 मध्ये टाटा सन्सवरील कर्जाचा बोजा २३.४ बिलियन डॉलरवरून वाढून २४.५ बिलियन डॉलर एवढा झाला आहे.

विविध उद्योग क्षेत्रांतील १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.

टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे सायरस मिस्त्री सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते.

1932 मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. टाटा समूहामध्ये सर्वांत मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६पासून संचालक आहेत.

रतन टाटा यांची कारकिर्द होती यशस्वी
रतन टाटा यांची कारकिर्द प्रचंड यशस्वी समजली जाते. त्यांच्या कार्यकाळात टाटांनी अनेक बड्या जागतिक कंपन्यांचे अधिग्रहण केले. टेटलेचे टाटा टीकडून ४५0 दशलक्ष डॉलरचे २000 सालातील अधिग्रहण, कोरसचे टाटा स्टीलकडून २00७ साली केलेले अधिग्रहण, जग्वार लँड रोव्हरचे टाटा मोटर्सने २00८ सालातील २.३ अब्ज डॉलरला केलेले अधिग्रहण यांचा त्यात समावेश आहे. रतन टाटा यांच्या कार्यकाळात कंपनीचा महसूल कित्येक पटीने वाढून २0११-१२मध्ये १00.0९ अब्ज डॉलरवर (अंदाजे ४,७५,७२१ कोटी रुपये) गेला होता. १९९१मध्ये तो १0 हजार कोटी रुपये होता.

ही समिती निवडणार नवा वारसदार
मिस्त्री यांचा वारसदार निवडण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत स्वत: रतन टाटा, टीव्हीएस उद्योग समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजदूत रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भट्टाचार्य वगळता उरलेले सर्व जण टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आहेत. आगामी चार महिन्यांत ही समिती नव्या चेअरमनचा शोध घेईल, असे सांगण्यात आले.

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
टाटा सन्सने एक निवेदन जारी करून मिस्त्री यांच्या हकालपट्टीची माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे की, टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मिस्त्री यांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, कंपनीचे सध्याचे सर्व सीईओ कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामागचे कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार?
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर टाटा समूहात सर्वात
मोठा भागीदार असलेल्या
शापूरजी आणि पालनजी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘‘टाटा सन्समधून सायरस मिस्त्रींना पदावरून दूर करण्याचा निर्णय हा अवैध आहे. सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय हा सवार्नुमते घेण्यात आला नाही. माजी सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली आहे’’, असे शापूरजी आणि पालोनजी समूहाने सांगितले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शापूरजी आणि पालोनजी या निर्णयाविरोधात हायकोटार्चा दरवाजाही ठोठावणार आहेत. सायरस मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर नऊ बोर्ड सदस्यांपैकी फक्त ८ जणांनी मतदान केलं. त्यातही दोन जण तटस्थ राहिले, अशी माहिती आहे. शापूरजी पालोनची समूहाची टाटा समूहात १८.४ टक्के भागीदारी आहे.

टाटांच्या कंपन्या
1 टीसीएस
2 टाटा मोटर्स
3 टाटा स्टील
4 टाटा पावर
5 टाइटन इंडस्ट्रीज
6 टाटा केमिकल्स
7 टाटा कम्युनिकेशन्स
8 टाटा ग्लोबल बेवरेजेज
9 इंडियन होटल्स
10 व्होल्टास

यांची नावे चर्चेत
पेप्सीच्या इंद्रा नूयी, व्होडाफोनचे
माजी सीईओ अरूण सरीन, टाटा इंटरनॅशनलचे नोएल टाटा, टीसीएसचे सीईओ एन चंद्रशेखरन, टाटा समूहातीलच इशात हुसैन आणि बी मथुरामन यांची टाटा समूहाच्या चेअरमनपदासाठी चर्चेत आहेत.

Web Title: Cyrus Mistry to 'Tata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.