लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:43 AM2024-06-11T07:43:44+5:302024-06-11T07:54:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर आता १८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतील नेत्याला दिले जाऊ शकते. लोकसभेत तीनवेळा निवडून आलेल्या नेत्या आणि भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू आहे.

D. Purandeshwari Will be News Lok Sabha Speaker? | लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत

लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमीत कमी वेळेत त्यांचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे ७२ सदस्यीय केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर आता १८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतील नेत्याला दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत मिळालेला जनाधार आणखी मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. लोकसभेत तीनवेळा निवडून आलेल्या नेत्या आणि भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडे बहुमत असले, तरी १८व्या लोकसभेत एकत्रित विरोधी पक्षाची ताकद कमी नाही, याची पंतप्रधान मोदी यांना जाणीव आहे. त्यामुळे सभागृह एकमताने चालवावे लागेल, याचे संकेत मोदींनी ४ जून रोजीच पक्षाच्या बैठकीत दिले होते. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्षपद निवड करताना, ते मित्रपक्षांशी सल्लामसलत करू शकतात. कारण त्यांना सहमतीने देश चालवायचा आहे. १७व्या लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले ओम बिर्ला यांच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. पण, त्याबाबत खात्री देता येत नाही. 

कोण आहेत पुरंदेश्वरी? 
- केंद्रात मंत्रिपदासाठीही पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्या लोकसभा अध्यक्षपदासाठी संभाव्य दावेदार असू शकतात. त्यामुळे मंत्रिपदाची संधी न दिल्याचे सांगितले जाते. 
- पुरंदेश्वरी या दिवंगत एन. टी. रामाराव यांच्या कन्या आहेत, तर त्यांची बहीण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची पत्नी आहे. चंद्राबाबू नायडू आणि भाजपला एकत्र आणण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
- २०१४ पूर्वी त्या कॉंग्रेसमध्ये होत्या. १५ व्या लोकसभेत त्यांनी कॉंग्रेसतर्फे विशाखापट्टणमचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच १४ व्या लोकसभेत त्या मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

यापूर्वी किती दिवसांत झाली होती निवड? 
२०१४मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळाची नावे निश्चित करण्यासाठी दहा दिवस घेतले आणि त्यानंतर सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड केली. 
२०१९मध्ये सात दिवसांत मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यावर दुसऱ्यांदा खासदार झालेले ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड केली. २०२४मध्ये ५ दिवसांत शपथविधी झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल.

Web Title: D. Purandeshwari Will be News Lok Sabha Speaker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.