दाभोळ वीज प्रकल्प महिनाभरात पुन्हा सुरू
By admin | Published: October 1, 2015 03:02 AM2015-10-01T03:02:01+5:302015-10-01T03:02:01+5:30
इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल
नवी दिल्ली: इंधन म्हणून वापरायच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्याने गेले दीड वर्ष ठप्प असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्पात येत्या १ नोव्हेंबरपासून ५०० मेवॉ वीजनिर्मि ती सुरु होईल आणि ही वीज रेल्वेला दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी येते केली.
दाभोळ प्रकल्पाचे १,९६७ मेवॉ क्षमतेचे वीजनिर्मिती केंद्र व त्यालाच जोडून असलेले वर्षाला ३० लाख टन द्रवरूप नैसर्गिक वायूची हाताळणी करू शकणारे टर्मिनल असे दोन एकजिनसी भाग आहेत.आता दिवाळखोरीत गेलेल्या अमेरिकेच्या एन्रॉन कंपनीने वाऱ्यावर सोडल्यानंतर राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (एनटीपीसी) व गॅस अॅथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) यांनी मिळून रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर लि. ही कंपनी स्थापन करून जुलै २००५ पासून हा प्रकल्प ताब्यात घेतला.
आता त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर कंपनीचे विभाजन केले जाईल. यापैकी एक कंपनी रत्नागिरी पॉवर व दुसरी रत्नागिरी गॅस म्हणून ओळखली जाईल. रत्नागिरी पॉवर कंपनी दाभोळ येथील फक्त वीज प्रकल्पाचे संचालन करेल तर गॅस कंपनी गॅस टर्मिनलचा व्यवहार सांभाळेल.
रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर लि. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विभाजनासह पुनरुज्जीवनाशी संबंधीत सर्व विषयांना मंजुरी दिली गेली. परिणामी दाभोळ प्रकल्पातून येत्या १ नोव्हेंबरपासून सुरुवातील ५०० मेवॉ वीजनिर्मि ती नक्की सुरु होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
प्रकल्पातून तयार होणारी ही ५०० मेवॉ वीज ४.७९ रु. प्रति युनिट या दराने रेल्वेला पुरविली जाईल, असे सांगून गोयल म्हणाले की, हे शक्य व्हावे यासाठी वीज व गॅसवरील शुल्क व कर माफ करण्यास महाराष्ट्र
सरकार तयार झाले आहे. तसेच ‘गेल’ही सवलतीच्या दराने प्रक्रिया व वाहतूक शुल्क आकारून गॅस पुरविमार आहे.
रत्नागिरी गॅस कंपनीत एनटीपीसी व ‘गेल’ यांचे समान प्रमाणात भाग भांडवल. महावितरणची तयारी असेल तर त्यांना काही प्रामामात भांडवलात सहभाग.
मूळ एकत्रित कंपनीवरील एकूण ७,८०० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ३००० कोटी रुपयांचे कजॅ नव्या रत्नागिरी गॅस कंपनीकडे वर्ग.
नवी गॅस कंपनी आणखी २००० कोटी रुपये गुंतवून गॅस टर्मिनलची क्षमता सध्याच्या ३० लाख टनांवरून ५० लाख टन वाढवेल. यासाठी सध्याच्या टर्मिनलसोबत ‘ब्रेकवॉटर’ची व्यवस्था केली जाईल. यामुळे हे टर्मिनल पावसाळ््यातही वापरता येईल.
अतिरिक्त गॅस कर्नाटक व गोव्याला खुल्या बाजारात विकला जाईल.