दादा गेले!

By admin | Published: July 27, 2015 12:52 AM2015-07-27T00:52:00+5:302015-07-27T00:52:00+5:30

दादासाहेब कोण होते? : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास त्यांना लाभला. गाडगेबाबांच्या अखेरच्या काळात ते सोबत होते. यामुळेच समतेची किनार

Dada has gone! | दादा गेले!

दादा गेले!

Next

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली

दादासाहेब कोण होते? : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास त्यांना लाभला. गाडगेबाबांच्या अखेरच्या काळात ते सोबत होते. यामुळेच समतेची किनार दादांच्या विचारांना होती. दादासाहेब खापर्डे यांच्या अमरावतीच्या प्रसिद्ध खापर्डेवाड्यात लोकमान्य टिळक अनेकदा येऊन गेले म्हणून दादासाहेब अनेक वर्षे लोकमान्यांच्या जयंतीच्या दिवशी राजकमल चौकातील या वाड्यात जात अगदी सहज म्हणून. हा वाडा विकला तेव्हा दादासाहेब कमालीचे अस्वस्थ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचा स्थायीभाव. बाबासाहेबांचे विचार माझा श्वास आहे, असे ते म्हणायचे. पण भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील क्षण जगण्याचे बळ आहे, असे ते सांगत. आज त्यांच्या जाण्याने श्वास हरवला आणि बळही संपले.
बिहारचे राज्यपाल म्हणून दादासाहेब उपाख्य रा.सू. गवई यांची नियुक्ती झाली त्या दिवशी त्यांच्या अमरावतीमधील कमलपुष्प बंगल्यावर जल्लोष होता. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत होते, रात्रीतूनच बंगल्यावर रोशणाईसुद्धा झाली होती. आकाशी व निळ्या रंगाच्या भिंती असलेल्या या टुमदार बंगल्याचे नाव कमलतार्इंच्या आग्रहाने ठेवले आहे असे दादासाहेब सांगायचे तेव्हा ताई लाजायच्या.. आणि म्हणायच्या मुलांनी शिकावे, समाजात नाव कमवावे, बंगला असावा. मोटार असावी.. हे साऱ्यांचेच स्वप्न असते. आम्हीही ते पाहिले. परिस्थितीने खूप शिकवले. मुंबईत दादासाहेब विधान परिषदेचे सभापती होते, पण कमलताई मुंबईहून येताना नवीन कपडे, पर्स, दागिन्यांचे सेट घेऊन येत आणि ते अमरावतीत आणून विकत. अनेक वर्षे हे असेच चालू होते. पै-पैसा जमा केला. त्याच्या कष्टातून हा बंगला उभा झाला.. नाव ठेवले ‘कमलपुष्प’!
हा संवाद पूर्ण झाला की, दादासाहेब पानदानातून एक विडा काढायचे आणि दोन तुकडे करून एकापाठोपाठ खायचे. तोबरा भरला की दोघेही प्रसन्न मुदे्रने मग हसायचे. बंगल्याच्या वरच्या हॉलमधील हा प्रसंग आता नसेल. कमलपुष्पच्या संसारकथेतील दादा हरवले..!
पांढरा स्वच्छ झब्बा-पायजामा, त्यावर शक्यतो काळ्या किंवा आकाशी रंगाचे जॅकेट, ठरवून तयार केलेली सोनेरी रंगाची चष्म्याची फ्रेम आणि अकोला जिल्ह्णातील तेल्हारा गावचा प्रसिद्ध असलेला काळा टोकदार जोडा घालून या माणसांची राजकारणात ‘दादागिरी’ सुरू असे. दादांचा दिवस बरेचदा दुपारी ३च्या पल्याड सुरू व्हायचा. तो पहाटे ४ला संपायचा. गरजेनुसार सकाळी ७लाही त्यांच्या दारात गर्दी असायची; आणि दादासाहेब लाकडी खुर्चीवर उशांचे ढीग रचून बसलेले असायचे. ते ज्यांना ओळखत त्यांना ते एकेरी नावाने हाक मारायचे.. नुकतीच ओळख झालेल्याला आडनावावरून आणि विश्वास टाकलेल्याशी ते वडिलांच्या नावाने हाक मारून बोलायचे. ऋणानुबंधाची विलक्षण हातोटी त्यांनी साधली होती. त्यांच्या खिशात १० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतच्या नोटा असायच्या. त्यांना भेटायला आलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते अनेकदा ‘भातकं’(भेट देणे यासाठी वऱ्हाडात वापरला जाणारा हा प्रसिद्ध शब्द दादा अत्यंत चपखल वापरत.) म्हणून पैसे देत आणि पुस्तक घे, असं आवर्जून सांगत. एसटीचे पास, शाळेची थकलेली फी, गावाकडे जायला पैसे नाहीत ही बोंब घेऊन त्यांना कोणीही भेटो खिशातून ते भातकं देत. दिवाळीच्या काळात त्यांच्या घरी आलेली मुलगी कधीही रिती हात गेली नाही. रात्र कितीही झाली तरी जेवणाची पंगत बंगल्यात असे. दादासाहेबांच्या बंगल्यात सगळ्यांचा मुक्त वावर होता. गौतम बुद्धांच्या शेकडो मूर्ती या बंगल्यात आहेत, पण त्या कोणी कोणी दिल्यात ते दादा क्षणभरात सांगायचे. मुंबईहून अमरावतीला ते कोलकाता मेलने यायचे व मध्यरात्रीच्या सेवाग्राम एक्स्प्रेसने परतायचे. कित्येक वर्षे हा क्रम होता. नागपूरहून मुंबईसाठी विदर्भ एक्स्प्रेस सुरू झाली. ती सुरुवातीला तीनच दिवस होती. अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्थानकावर तिचा थांबा नव्हता. त्यासाठी स्थानकावरच आमदार बी.टी. देशमुख यांनी आंदोलन सुरू केले. प्रा. मदन भट यांच्या नेतृत्वात प्रवासी मंडळ मोठ्या घोषणा देत होते. दादांनीही सहभाग घेतला. पण दादा त्यांच्या चतुरस्र संवाद शैलीतील संदर्भी पण मिश्कील भाषणात म्हणाले, मी संयुक्त महाराष्ट्रवादी आहे. हा लढा विदर्भ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी आहे. मी जाणे-येणे वेगळ्याच गाडीने करतो, पण गाडीच्या नावाने का होईना रेल्वेचा विदर्भातील अनुशेष दूर होत आहे. त्यामुळे थांबा मिळेस्तोवर आंदोलनात मी असेल. त्यांनी थांबाही मिळवला आणि गाडी सातही दिवस धावायला लागली.
सुदामकाका देशमुख, भाई मंगळे यांच्यापाठोपाठ दादासाहेब गवई यांच्यापासूनही अमरावती पोरकी झाली. दुष्काळाने अमरावती जिल्हा धगधगत असताना रा.सू. गवई, सुदामकाका देशमुख, बी.टी. देशमुख व देवीसिंह शेखावत यांनी अपर वर्धा धरणासाठी लढलेली राजकीय व प्रशासकीय लढाई विलक्षण चिवट आहे. सध्याच्या राजकारणात असा संघर्ष होणे नाही. कारण नंतरच्या काळात पाणी जसे मिळाले तसे राजकारणातील लोकोपयोगी मुद्द्यांचे प्रवाहही बदलले.
दादासाहेब ४५ वर्षे सत्तेच्या आवरणात होते, त्यांच्याभोवती वलय होते. पण ते मखरात कधीच बसले नाहीत. ते सामान्यांचे नेते होते. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविरुद्ध त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. पराभूत झाले. त्यानंतर ३५ वर्षे त्यांनी अमरावतीचा खासदार होण्याचे स्वप्न पाहिले. समन्वयाचे राजकारण केले. १९९८मध्ये ते खासदार झाले. त्यापूर्वी व नंतर त्यांनी निवडणूक लढविली, पण धार्मिक ध्रुवीकरणाच्या झोकात हा समन्वयवादी राजकारणी टिकूच शकला नाही. शिवसेनेने हा मतदारसंघ ताब्यात घेतला; पण निवडणुकीनंतर आपण जणू निवडणूक लढलोच नाही,असे मैत्रीचे बंध दादासाहेबांनी विरोधकांसाठीही जोडले. तीन निवडणुकीत त्यांना शिवसेनेने चीतपट केले, पण त्यानंतरही त्यांची दोस्ती शिवसेनाप्रमुखांसोबत उत्तरोत्तर वाढली.
मैफल जमली की ते बोटाचे कांडे मोजायचे आणि पहिले वाक्य असायचे, ‘तार्इं’च्या जिल्ह्णात मी एकमेव ‘दादा’ आहे... आणि उषाताई चौधरी, प्रतिभाताई पाटील, वसुधाताई देशमुख, पुष्पाताई बोंडे, चंद्रप्रभाताई बोके, किरणताई महल्ले आणि सुरेखाताई ठाकरे अशी सर्वपक्षीय स्त्री नेत्यांची नावे घेऊन शेवटी म्हणायचे मी एकच.. दादासाहेब गवई!! पी.के. देशमुख, राम मेघे, अनिल वऱ्हाडे, बबनराव मेटकर, यशवंत शेरेकर, शरद तसरे ही नावे ते घेत आणि म्हणत राजकारणात मला गॉडफादर नाही. मी माझा गॉडफादर.
कुष्ठरोग्यांच्या मदतीसाठी त्यांनी डॉ. शिवाजीराव पटवर्धन व बाळासाहेब मराठे यांच्यासोबत सरकारशी दोन हात केले. विद्याधर गोखले, ‘धग’कार उद्धव शेळके, चित्तरंजन कोल्हटकर, सुरेश भट, विश्राम बेडेकर, मधुकर केचे, राम शेवाळकर, प्राचार्य प.सी. काणे, प्राचार्य अण्णा वैद्य व सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमाचा संघर्ष करणारे प्रा. सुरेश पाद्ये यांच्यासोबत साहित्यापासून गझलेपर्यंतच्या कैक मैफिली त्यांनी सजवल्या. कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचे एकनाथराव रानडे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध ऐन तारुण्यात जुळले. प्रसिद्ध सर्वोदयी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचे भगिनीप्रेम अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मोठे करून गेले. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांसोबतची महाविद्यालयीन मैत्री कॉलेजातील जीवनशैलीची मिठ्ठास वाढविणारी होती. सुरेश भटांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हाची या दोघांची चर्चा प्रलयंकारी होती. ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ हे गीत भटांनी दादासाहेबांना म्हणवून दाखविले होते.
दादा निवडणुकीपुरते कधी जगलेच नाहीत. त्यांच्या नेतृत्वात माधुर्य व मृदुता होती. भाषा व कायद्यांवरील त्यांची प्रगल्भता विलक्षण होती. दलितांचे नेते ते कधीच नव्हते, ते साऱ्यांचे दादा होते. समाजातील विध्वंसावर मात करा, हे त्यांनी दंगली शमवताना सांगितले. अ‍ॅट्रॉसिटीचा हत्यार म्हणून वापर करू नका, असे स्पष्टपणे सांगण्याची धमक दादांनी दाखविली. समाजाच्या विद्रोहाला त्यांनी बांध घातला.

Web Title: Dada has gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.