Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच फडकला शिवसेनेचा भगवा, दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय, भाजपाचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 04:00 PM2021-11-02T16:00:43+5:302021-11-02T17:06:41+5:30
Dadra Nagar Haveli By Election 2021 Result Update: दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार Kalaben Delkar यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी BJP च्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५१ हजार २६९ मतांनी पराभव केला आहे.
सिल्व्हासा/मुंबई - आतापर्यंत महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या शिवसेनेने आज एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५१ हजार २६९ मतांनी पराभव केला आहे. कलाबेन डेलकर यांच्या रूपात शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरून पहिला खासदार लोकसभेत पोहोचला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिकांची दिवाळी अधिकच गोड होणार आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जारा रिक्त झाली होती. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यावरून शिवसेनाही आक्रमक झाली होती. दरम्यान, येथे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणुकीचा काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर भाजपाकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दादरा नगर हवेली मतदारसंघातील मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या मतमोजणीमध्ये शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. मतमोजणी जसजशी पुढे पुढे सरकत गेली तसतशी कलाबेन यांचा आघाडी वाढत गेली आणि भाजपाच्या विजयाच्या आशा मावळत गेल्या. अखेरीस कलाबेन यांना एकूण १ लाख १८ हजार ०३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार ७६६ मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचा उमेदवार याठिकाणी तिसऱ्या स्थानी राहिला. काँग्रेस उमेदवार महेशभाई धोडी यांनी ६१५० मते मिळाली.
दरम्यान, आज दादरा नगर हवेलमध्ये मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्तार होण्यास मदत होणार असून, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीतही शिवसेना अधिक जोमाने उतरण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेने ही निवडणूक लढवावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे आणि डेलकर कुटुंबीयांच्या शिवसेनेतील प्रवेशासाठी पुढाकार घेण्यारे संजय राऊत यांचे वजनही या विजयामुळे वाढणार आहे.