दादरी हत्याप्रकरण, गुलाम अलींच्या कार्यक्रमाचा वाद दुर्दैवी - मोदी
By Admin | Published: October 14, 2015 09:42 AM2015-10-14T09:42:45+5:302015-10-14T09:43:11+5:30
दादरीत घरात बीफ बाळगल्याच्या संशयावरुन जमावाने मुस्लिम व्यक्तीची हत्या केल्याची घटना आणि गुलाम अलींच्या कार्यक्रमावरुन झालेला वाद या दुर्दैवी घटना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - दादरीत घरात बीफ बाळगल्याच्या संशयावरुन जमावाने मुस्लिम व्यक्तीची हत्या केल्याची घटना आणि गुलाम अलींच्या कार्यक्रमावरुन झालेला वाद या दुर्दैवी घटना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधक अशा घटनांवरुन मतांचे ध्रूवीकरण करत असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.
दादरीतील हत्याप्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य न केल्याने मोदींनी मौन धारण केल्याची टीका विरोधकांकडून होत होती. अखेर मोदींनी या प्रकरणासंदर्भात मौन सोडले आहे. बुधवारी मोदींनी आनंदबाझार पत्रिका या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादरीतील घटनेचा निषेध दर्शवला आहे. दादरी, गुलाम अलींच्या कार्यक्रमाचा वाद या दुर्दैवी घटना आहेत पण यात केंद्र सरकारचा सहभाग काय असा सवालच त्यांनी उपस्थित केला. भाजपाने नेहमीच ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा विरोध दर्शवला आहे असेही त्यांनी नमूद केले.