पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Published: May 8, 2017 01:35 AM2017-05-08T01:35:23+5:302017-05-08T01:35:23+5:30
मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
नवी दिल्ली : मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षांत दर दुसऱ्या दिवशी दहशतवादी घटना घडल्या असून, २०१२ ते २०१६ दरम्यान घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद आणि ९० निरपराध नागरिक ठार झाले.
माहिती अधिकार कायद्यातहत गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या बाजूने हल्ला करण्याच्या ४०५ घटना घडल्या. यात दहा सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. २०१६ मध्ये नियंत्रणरेषेसह इतर ठिकाणी अशा ४४९ घटना घडल्या. यात १३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी घटना घडल्या आणि त्यात किती जवान शहीद झाले व किती नागरिक मारले गेले, याची माहिती विचारण्यात आली होती. पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत आहे, असे सेवानिवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी सांगितले. आता तर नवीन प्रकार सुरू झाला आहे. सुरक्षा दले जेव्हा दहशतवाद्यांना घेरतात, तेव्हा सोशल मीडियावर संंदेश पाठवून लोक त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे सुरक्षा दलाला कारवाई करणे कठीण होते. (वृत्तसंस्था)
२०१२ ते २०१६ या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. या अवधीत सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत ५०७ दहशतवादी ठार झाले.
२०१२ मध्ये २२० घटनांत १५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले, तर सुरक्षा दलाने प्रतिहल्ला करून ७२ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
२०१३ मध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या १७० घटना घडल्याची माहिती समोर आली असून, यात ५२ जवान शहीद, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने चोख उत्तर देत ६७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
२०१४ मध्ये अशा २२२ घटना घडल्या असून, यात ४७ जवान शहीद, तर २८ नागरिकांचा बळी गेला. सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ११० दहशतवादी मारले गेले.
२०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाही हिंसाचाराच्या ३२२ घटना घडल्या; यात ८२ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने १५० दहशतवाद्यांना खात्मा केला.