बाबा रामदेव यांच्या कंपनीस दणका, हायकोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 05:41 AM2018-12-30T05:41:31+5:302018-12-30T05:41:43+5:30
‘दिव्या फार्मसी’ने त्यांच्या वर्ष २०१४-१५ मधील ४.२१ अब्ज रुपयांपैकी दोन कोटी रुपयांचे शुल्क आदिवासींच्या कल्याणासाठी द्यावे, अशी नोटीस ‘उत्तराखंड बायोडायव्हर्सिटी बोर्डा’ने दिली.
नैनिताल : उत्तराखंड उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या एका निकालामुळे योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘दिव्या फार्मसी’ या कंपनीस दणका बसला असून, जैवविविधता कायद्यानुसार (बायोडायव्हर्सिटी) कंपनीला आपल्या उत्पन्नातील सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम आदिवासी कल्याण निधीसाठी द्यावी लागणार आहे.
‘दिव्या फार्मसी’ने त्यांच्या वर्ष २०१४-१५ मधील ४.२१ अब्ज रुपयांपैकी दोन कोटी रुपयांचे शुल्क आदिवासींच्या कल्याणासाठी द्यावे, अशी नोटीस ‘उत्तराखंड बायोडायव्हर्सिटी बोर्डा’ने दिली. त्याविरुद्ध केलेली याचिका न्या. सुधांशू धुलिया यांनी फेटाळली. कंपनीचे असे प्रतिपादन होते की, अशा प्रकारे उत्पन्नाचा ठराविक वाटा आदिवासी कल्याणासाठी देण्याची ‘बायोडाव्हर्सिटी कायद्या’तील तरतूद स्वदेशी कंपन्यांना लागू नाही. वन उत्पादनांचा वापर करण्यासाठीही त्यांना पूर्वपरवानगीची गरज नाही.