खिचडीत डाळ, पुलावमध्ये भाज्याच; तांदूळ निर्यातबंदीनंतर भाव उच्चांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 08:02 AM2023-09-09T08:02:09+5:302023-09-09T08:02:16+5:30
भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे.
नवी दिल्ली : भारताने तांदळाच्या निर्यात बंदी केल्यानंतर ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात तांदळाच्या किमती १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) शुक्रवारी दिली. संघटनेने अहवालात म्हटले आहे की, जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये तांदळाच्या किमती ९.८ टक्के वाढल्या. भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे.
भारताने जुलैमध्ये बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तांदूळ निर्यात बंदी निर्णय जाहीर करताना ग्राहक व्यवहार व अन्न मंत्रालयाने म्हटले होते की, निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारात पुरेसा तांदूळ उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच दरवाढीलाही लगाम लागेल.
बंदीमुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत
अहवालात म्हटले आहे की, भारताच्या तांदूळ निर्यात बंदीच्या कालावधीबाबतची अनिश्चितता आणि बंधनांमुळे निर्माण झालेल्या चिंता यामुळे पुरवठा साखळीतील व्यावसायिकांनी साठे रोखून धरले आहेत. काही जण कराराबाबत फेरवाटाघाटी करीत आहेत, तर काहींनी किंमत प्रस्ताव देणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारातील तांदळाची उपलब्धता घटली आहे. तांदूळ हा जगातील प्रमुख आहार असून त्याच्या किमती अनेक घटकांच्या पार्श्वभूमीवर वाढल्या आहेत.
अन्न किंमत निर्देशांक मात्र २ वर्षांत नीचांकी
पॅरिस : तांदळाच्या किमती घटल्या तरीही ऑगस्टमध्ये एफएओचा जागतिक अन्न निर्देशांक घसरून दोन वर्षांच्या नीचांकावर गेला. जगात सर्वाधिक व्यापार केल्या जाणाऱ्या खाद्यवस्तूंच्या किमतींवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्टमध्ये घसरून १२१.४ अंकांवर आला.