दाल लेकवर ‘माणुसकी’चे तरंग!

By admin | Published: August 27, 2016 06:06 AM2016-08-27T06:06:24+5:302016-08-27T06:06:24+5:30

धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे

Dal Lake on the wave of 'Manusaki'! | दाल लेकवर ‘माणुसकी’चे तरंग!

दाल लेकवर ‘माणुसकी’चे तरंग!

Next


श्रीनगर : धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे; पण श्रीनगरमधील हा भाजीबाजार या संचारबंदीला अपवाद आहे. येथे दाललेकमध्ये नित्यनेमाने बोटीतून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आपला दिनक्रम कायम सुरू ठेवला आहे. अर्थात त्यावर कुणाचा काही आक्षेपही नाही. कदाचित, श्रीनगरातील दाललेकवर टिकून असलेल्या माणुसकीचे हे तरंग असावेत.
हिंसाचारामुळे जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड करावी लागत आहे; पण या परिस्थितीला अपवाद ठरले आहे तो येथील दाललेक. १०० वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण असलेले श्रीनगरमधील हा दाललेक या संचारबंदीच्या काळातही सकाळच्या वेळी तुम्हाला फुललेला दिसेल. तोच गजबजाट, तेच सौंदर्य, तीच धावपळ येथे बघायला मिळेल. सूर्योदयाच्या किरणांसोबत सकाळीच येथील सरोवर परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, तेव्हाच ५० हून अधिक भाज्यांच्या बोटी या दाललेकवर दाखल झालेल्या असतात. परिसरातील भाजी विक्रेत्यांचा हा दिनक्रम आहे. अवघ्या दोन तासांत भाज्या विकून अगदी ऊन्हे तापू लागण्यापूर्वीच हे भाजी विक्रेते भाजी विकून निघालेले असतात. या भाजी बाजारालाही एका शतकाची परंपरा आहे.
येथील भाजी विक्रेते अब्दुल रेहमान म्हणतात की, हा बाजार संचारबंदीमुळे बंद नाही. परिसरातून नित्यनेमाने येथे भाजी विक्रेते येतात. दरम्यान, येथे सरोवरावर सकाळीच टोमॅटो, वांगे, कोबी आदी ताज्या भाज्या विक्रीसाठी येतात. (वृत्तसंस्था)
>दररोज होते लाखो रुपयांची उलाढाल
या भाजी विक्रेत्यांचे ना दुकान आहे ना मालकीची जागा. सरोवरात भाजीची बोट घेऊन ते येतात आणि भाजी विक्री झाल्यानंतर निघून जातात.
अशाच भाजी विक्रेत्यापैकी एक नजीर बट. ३५०० रुपयांची भाजी घेऊन तो येतो. त्याच्यासारख्या अनेकांचे उपजीविकेचे भाजी विक्री हे साधन आहे.
थोडीथोडकी नाही, तर दररोज लाखांची उलाढाल या भाजी बाजारात होते. भाज्यांच्या ठोक विक्रीचाही हा बाजार आहे.
100
वर्षांपासून असंख्य पर्यटकांचे आकर्षण असलेला दाललेक संचारबंदीतही सकाळच्या वेळी फुललेला दिसेल.
>दाललेक येथे नादरू (कमल ककडी, कमळांची आतून स्वच्छ केलेली देठे, ज्याची उत्तर भारतात सर्रास भाजी बनवली जाते) विक्रीसाठी आलेल्या आशिक हुसेन यांनी सांगितले की, हे सर्व विक्रेते स्थानिक आहेत. विशेष म्हणजे या भाज्यांसाठी खतांचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे या भाज्यांची गोडी अधिक असल्याचे ते सांगतात.

Web Title: Dal Lake on the wave of 'Manusaki'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.