दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:38 AM2021-05-17T05:38:14+5:302021-05-17T06:31:14+5:30
विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती.
चेन्नई : तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात दलित लोकांना शिक्षा म्हणून सवर्ण समुदायातील लोकांच्या पाया पडायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गावातील आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती.
यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी गर्दीला हटविले. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लोकांना पोलिस पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे लेखी माफी दिल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले.
हे लोक जेव्हा आपल्या गावी परतत होते तेव्हा गावातील सवर्णांनी या लोकांना १४ मे रोजी पंचायतीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हे लोक कंगारूच्या कोर्टात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. या ठिकाणी या लोकांना सवर्णांच्या पाया पडण्यास भाग पाडले. त्यानंतर थिरुमल, संथानम आणि अरुमुगम यांनी पाया पडून माफी मागितली. तक्रारीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक गावात पोहचले आणि ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.