दलित भेदभावावरून संसद दणाणली
By admin | Published: December 3, 2015 03:17 AM2015-12-03T03:17:27+5:302015-12-03T03:17:27+5:30
दलितांना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीवरून संसदेत बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही सभागृहात प्रचंड रणकंदन झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यसभेत सलग तीन
नवी दिल्ली : दलितांना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीवरून संसदेत बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही सभागृहात प्रचंड रणकंदन झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यसभेत सलग तीन दिवस डॉ.आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचीही चर्चा झाल्यानंतर, बुधवारी दलितांना मिळणाऱ्या वागणुकीवर दोन्ही सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. राज्यसभेत सेलजा यांच्या तक्रारीवरून तर लोकसभेत हरयाणातल्या दोन दलित मुलांच्या हत्याकांडानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी व्यक्त केलेल्या बेजबाबदार प्रतिक्रियेच्या विरोधात, काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यावर मोदी सरकार व व्ही.के.सिंगांच्या विरोधात काँग्रेस सदस्यांची अखंड घोषणाबाजी लोकसभेत सुरू होती.
गुजरातच्या बेट व्दारका मंदिरातल्या पुजाऱ्याने आपल्या जातीची चौकशी केली या माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांच्या आरोपाचे खंडन राज्यसभेत अर्थमंत्री अरूण जेटलींनी केले. इतकेच नव्हे तर ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सेलजांच्या कृत्रिम बनावटी भेदभावाचे (मॅन्युफ्रॅक्चर्ड डिस्क्रिमिनेशन)चे हे उदाहरण असल्याची शेरेबाजी करताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज दुपारी ३.३0 पर्यंत चारदा तहकूब झाले.
अखेर उपसभापती कुरियन यांनी आपल्या दालनात सेलजांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या तमाम गटनेत्यांची बैठक घेतली व या तणावातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कामकाज तोपर्यंत तहकूब ठेवण्यात आले. उभय पक्षांमधे समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात अखेर तडजोड झाली की नाही, त्याचा खुलासा सभापतींच्या सल्ल्याने गुरूवारी सभागृहातच केला जाईल, असे कुरियन यांनी सभागृहाला सांगीतले.
राज्यसभेतल्या गदारोळाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की संविधान दिनाच्या चर्चेत भाग घेतांना सोमवारी कुमारी सेलजा म्हणाल्या, ‘गुजरातमधील व्दारकेत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. समुद्रातल्या एका बेटावर यापैकी बेट व्दारका हे प्राचीन कृष्ण मंदिर आहे. केंद्रीय मंत्री असतांना मी तिथे दर्शनाला गेले तेव्हा मला माझी जात विचारण्यात आली. गुजरातचे तथाकथित विकास मॉडेल यालाच म्हणायचे काय? सरकारला असा उपरोधिक सवाल विचारतांना सेलजांना आपला भावनावेग सभागृहात आवरता आला नाही.
सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा बुधवारी स्वयंस्फूर्त खुलासा करतांना जेटली म्हणाले, सेलजांचा आरोप खरा नाही. व्दारकेत मंदिराच्या व्यवस्थापनाची, तिथल्या स्वच्छतेची, प्रशंसा करणारा अभिप्राय सेलजांनी स्वत:च तिथल्या अभिप्राय पुस्तिकेत लिहिला आहे. सेलजांचा हा अभिप्रायही जेटलींनी सभागृहाला वाचून दाखवला. यावेळी धावतच सभागृहात परतलेल्या सेलजांनी जेटलींना बजावले, आपण सभागृहाचे नेते आहात, कृपाकरून माझ्याबाबत सर्वांची दिशाभूल करू नका.
(लोकमत न्यूज नेटवर्क)