दलित जळीतकांड; विरोधकांचा केंद्रावर हल्ला
By admin | Published: October 22, 2015 04:08 AM2015-10-22T04:08:38+5:302015-10-22T04:08:38+5:30
हरियाणातील फरिदाबादेत एका दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधी पक्षांनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : हरियाणातील फरिदाबादेत एका दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधी पक्षांनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
दरम्यान फरिदाबादमध्ये बुधवारी गावकरी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले. होरपळून मृत्युमुखी पडलेल्या दोन बालकांचे मृतदेह घेऊन त्यांनी दिल्ली-आग्रा महामार्गावर चक्काजाम केला. याच वेळी अनेक राजकीय नेत्यांनीही तेथे हजेरी लावली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना लाठीमार करावा लागला. आंदोलनकर्त्यांना पांगविल्यावर बालकांचे मृतदेह रुग्णावाहिकेने इस्पितळात पाठविण्यात आले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शेजारील जिल्ह्णातील पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुनपेड गावात जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपा आणि रास्वसंघावर दुर्बल आणि गरिबांना चिरडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.
त्यांच्या या भूमिकेमुळेच अशा घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याकडून जी काही मदत हवी असेल ती देण्याची ग्वाही आपण पीडित कुटुंबाला दिली असल्याचे राहुल यांनी सांगितले. फरिदाबादेतील सुनपेड गावात मंगळवारी रात्री सवर्ण समाजातील काही गुंडांनी एका दलित कुटुंबाचे घर पेट्रोल ओतून जाळल्याने या कुटुंबातील दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला तर त्यांचे आईवडील गंभीर जखमी झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
हरियाणा सरकार : जळीतकांडाच्या सीबीआय चौकशीची शिफारस
चंदीगड : फरिदाबाद जिल्ह्णात मंगळवारी घडलेल्या दलित हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस हरियाणा सरकारने केली आहे. सवर्णांनी एका दलित कुटुंबाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. त्यात दोन बालकांचा मृत्यू झाला होता तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले होते. ‘मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केलेली आहे.
पोलीस उपायुक्त पुरणचंद यांच्या नेतृत्वाखाली आधीच विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे,’ असे खट्टर यांचे प्रसिद्धी सल्लागार अमित आर्य यांनी सांगितले. या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि राज्य सरकारने पीडित दलित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केलेली आहे, असे आर्य म्हणाले.
राहुल गांधी पत्रकारांवर भडकले
एका पत्रकाराने राहुल गांधी यांना आपण या मुद्याचे राजकारण करीत आहात काय? असा थेट प्रश्न विचारताच ते प्रचंड संतापले. एखाद्याच्या घरी आल्यावर कुणी असे म्हणत असेल तर ते अपमानास्पद आहे. पीडितांचा तो अपमान आहे. मी येथे फोटो काढण्यासाठी आलेलो नाही. लोकांचे जीव जात आहेत आणि तुम्हाला हे फोटोशूट वाटते काय? असा संतप्त सवाल राहुल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला.
‘कष्ट की बात’ करा, लालूप्रसाद, नितीशकुमारांचा टोला
आत्मस्तुतीत रममाण राहणाऱ्या मोदींनी ‘मन की बात’ करण्याऐवजी देशातील पीडित, वंचित, मागास आणि दलितांच्या ‘कष्ट की बात’ केली पाहिजे, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर केली. नितीशकुमार यांनी आमचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही सुरळीत सुरूआहे, असा दावा करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी टिष्ट्वटरवर दिले.
मदतीस विलंब झाल्यास आंदोलन - मायावती
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दलित कुटुंबाला जाळण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून दोषींना अटक आणि पीडित कुटुंबाला मदतीत थोडाही विलंब झाल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
असहिष्णुतेला देशात अजिबात थारा नाही - राजनाथसिंह
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त करतानाच अशा घटनांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये, असे प्रतिपादन केले.
गुरुवारी नवी दिल्लीत भारतीय पोलीस प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जाती, पंथ आणि धर्माच्या नावावर विद्वेष निर्माण करणाऱ्या अशा घटना देशहिताच्या नाहीत. सहिष्णुता आणि एकता हे या देशाचे मूल्य असून त्याची जपणूक झाली पाहिजे.