दलित खासदारांनी द्यावेत राजीनामे
By admin | Published: August 1, 2016 05:48 AM2016-08-01T05:48:56+5:302016-08-01T05:48:56+5:30
दलितांवर भाजपाच्या गुंडाद्वारे देशभर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उदितराज यांच्यासह भाजपाच्या तमाम दलित खासदारांनी आपले राजीनामे सादर केले पाहिजेत
नवी दिल्ली : दलितांवर भाजपाच्या गुंडाद्वारे देशभर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उदितराज यांच्यासह भाजपाच्या तमाम दलित खासदारांनी आपले राजीनामे सादर केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ट्विटरवर व्यक्त केली. हिंदुत्वाच्या तथाकथित धर्मरक्षकांविरुद्ध खासदार उदितराज यांनी शनिवारी केलेल्या निवेदनानंतर केजरीवालांची ही प्रतिक्रिया आली आहे.
तामिळनाडूत काही दलित कुटुंबांना नागपत्तनमच्या प्राचीन बद्राकालियाम्मन मंदिरात पूजा करण्यास अनुमती देण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर, काही दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचे ठरवले होते.
या पार्श्वभूमीवर कॉन्फडरेशन आॅफ एससी एसटी आॅर्गनायझेशन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे दिल्लीतले दलित खासदार उदितराज यांनी शनिवारी नमूद केले की, ‘मंदिराची दारे दलितांना बंद करण्यात आली तर ते चर्च अथवा मशिदीत जातील. आम्ही त्याला जबाबदार नाही. हिंदुत्वाला जितका धोका तथाकथित धर्मरक्षकांपासून आहे, तितका धर्मांतराच्या प्रक्रियेतूून नाही.’
आपल्या निवेदनाचे अधिक स्पष्टीकरण करताना उदितराज म्हणतात, ‘जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्म नाही, जिथे धर्मरक्षणाच्या नावाखाली आपलेच लोक आपल्याच लोकांवर हल्ले चढवतात. जो कोणी सत्तेवर असतो तो दलितांना लक्ष्य बनवतो.
फक्त संख्येतले अंतर कमी अधिक होते. हिंदू धर्माचे सर्वांत मोठे
मंदिर कंबोडियात आहे. विशेष म्हणजे आज तिथे एकही हिंदू नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>भारतात हिंदू धर्माचे अस्तित्व संकटात सापडले असे वाटत असेल तर दलित समुदाय त्याला जबाबदार नसून तथाकथित हिंदू धर्मरक्षकच त्याला कारणीभूत ठरणार आहेत. - उदितराज, भाजपा खासदार, दिल्ली