दलित अत्याचारांत भाजपाचेच लोक!

By admin | Published: August 12, 2016 04:50 AM2016-08-12T04:50:51+5:302016-08-12T04:50:51+5:30

गोरक्षणाच्या वा अन्य कोणत्याही कारणास्तव दलितांवर झालेले अत्याचार सहन केले जाणार नाहीत. असे अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत

Dalit oppression of the people of BJP! | दलित अत्याचारांत भाजपाचेच लोक!

दलित अत्याचारांत भाजपाचेच लोक!

Next

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
गोरक्षणाच्या वा अन्य कोणत्याही कारणास्तव दलितांवर झालेले अत्याचार सहन केले जाणार नाहीत. असे अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी लोकसभेत केले. मात्र, गोरक्षणाच्या नावाखाली तुमच्या पक्षाचे लोकच दलितांवर अत्याचार करण्यात गुंतले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी सरकारवर केला.
तसेच दलितांवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर गोरक्षकांच्या संघटनांवरच बंदी घालावी, अशी मागणी विरोधकांनी केली आणि सरकारच्या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. गोरक्षणाच्या नावाखाली काही समाजकंटक दलितांवर अत्याचार करत असल्याचेही राजनाथसिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच विधान केले होते. दलितांवरील अत्याचार ही मानसिक विकृती असून, हे अत्याचार थांबवणे हे आव्हान आहे, असेही गृहमंत्र्यांनी बोलून दाखवले. मात्र केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजपाचे सरकार आल्यापासूनच दलितांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर गेल्या ७0 वर्षांत जे अत्याचार थांबवणे तुम्हाला जमले नाही, ते दोन वर्षांत थांबले नाहीत, म्हणून आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले.
दलित अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलायला का तयार नाहीत, असा सवालही विरोधी सदस्यांनी केला. त्यावर पंतप्रधान बोलले वा नाही बोलले, तरी अत्याचार थांबावेत, अशीच त्यांची कृती आहे, असा खुलासा राजनाथसिंग यांनी केला.
दलितांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसने कायमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी विरोधकांवर केली, तर देशातील उजव्या विचारांच्या आणि गोरक्षकांच्या नावाने दलितांवर हल्ले करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांना सरकार आणि भाजपाचा पाठिंबा आहे, असा आरोप काँग्रेसचे के. एच. मुनियप्पा यांनी केला. भाजपा सत्तेवर आल्यापासून दलित आणि आदिवासींमध्ये भीती व दहशतीचे वातावरण असल्याची टीकाही त्यांनी केली.


अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा
चर्चेत भाग घेणाऱ्या जवळपास प्रत्येक विरोधी सदस्याने गुजरातच्या उना गावात दलितांना झालेल्या अमानुष मारहाणीचा उल्लेख करीत गोरक्षकांच्या सर्व संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना दलितांवर इतके अत्याचार होत नव्हते, याचा उल्लेख करीत, सध्याच्या अत्याचारांना आताचे सरकारच कारणीभूत असल्याचा दावा मुनियप्पांनी केला. हे सरकार आल्यापासून दलित अत्याचारातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण खाली आल्याचेही काही सदस्यांनी नमूद केले. सहा तास चाललेल्या चर्चेत माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सरकारची बाजू जोरात मांडली. भाजपाचे उदित राज, भर्तुहारी मेहताब (बिजद), सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस) आदी सदस्यांनी भाग घेतला.

रोज देशात किमान एका दलित महिलेवर बलात्कार होत आहे आणि प्रत्येक अठरा मिनिटाला दलितांना अत्याचाराला सामोरे जावे लागते. ३७.८ टक्के दलित विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये वेगळे बसवले जाते आणि २४.५ टक्के दलितांना पोलीस ठाण्यातही प्रवेश दिला जात नाही. हे माहीत असूनही केंद्र व राज्यातील भाजपा सरकार काहीच कारवाई करत नाही.
- पी. के. बिजू , माकप

Web Title: Dalit oppression of the people of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.