त्रावणकोरच्या मंदिरात प्रथमच दलित, आदिवासी पुरोहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:18 AM2017-10-08T02:18:56+5:302017-10-08T02:19:07+5:30
केरळच्या प्रख्यात त्रावणकोर मंदिराने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्रावणकोर देवस्थान समितीने पुजा-यांच्या यादीत सहा अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचा समावेश केला आहे
तिरुअनंतपुरम : केरळच्या प्रख्यात त्रावणकोर मंदिराने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्रावणकोर देवस्थान समितीने पुजा-यांच्या यादीत सहा अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचा समावेश केला आहे. मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पुरोहितांच्या यादीत एकूण ३६ ब्राह्मणेतर असणार आहेत.
त्रावणकोर मंदिर प्रशासनाने या आधीच ब्राम्हणांव्यतिरिक्त इतर जातींच्या व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक केली होती, पण यंदा पहिल्यांदाच अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांची पुजारी म्हणून नेमणूक झाली आहे. मंदिराच्या निवड समितीने गुरुवारी ६२ पुजा-यांची नावे निश्चित केली. लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन, राज्य लोकसेवा आयोगामार्फत या नेमणुका करण्यात आल्या. या नव्या यादीत २६ ब्राह्मणांचा सहभाग आहे.
ब्राम्हणेतर व्यक्तींच्या नेमणुकांना आमचा विरोध नाही, पण ज्यांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांना धार्मिक विधी, तसेच पूजाअर्चा आदींची व्यवस्थित माहिती असावी, असे आमचे म्हणणे आहे. केवळ आरक्षणाच्या निकषांवर नियुक्त्या होता कामा नयेत. संबंधित व्यक्तीचे ज्ञान व मंदिराच्या कार्यप्रणालीवर व विश्वासावर निवड होणे अपेक्षित आहे, असे आॅल इंडिया ब्राह्मण फेडरेशनचे अक्कीरामन कालिदासन भट्टतीरीपाद यांनी म्हटले आहे.
देवस्थान बोर्डाचे मंत्री कडकमपल्ली सुरेन्द्रन यांनी मेरिटच्या आधारे पुजाºयांच्या नेमणुका करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे, या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी सर्वांची एकत्र लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांच्याच मुलाखती झाल्या. त्यानंतर, प्रत्यक्ष नेमणुका केल्या, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
प्रथमच ब्राह्मणेतर पुजारी
देवस्थान बोर्डाचे चेअरमन राजगोपालन नायर म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती व ब्राह्मणेतर अन्य जातींच्या लोकांना मंदिरात पुरोहिताचे काम पहिल्यांदाच देण्यात येत आहे. त्रावणकोर देवस्थान समितीची स्थापना १९४९ साली झाली. अनेक वर्षांपासून मंदिरातील पुजाºयांच्या जागांसाठीही आरक्षण असावे, अशी मागणी होत होती.