दलित महिलेस मारहाण; भाजपा आमदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:44 AM2018-03-13T04:44:27+5:302018-03-13T04:44:27+5:30
दलित महिलांना मारहाण करुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी रुद्रपूरचे भाजप आमदार राजकुमार ठुकराल यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेहराडून : दलित महिलांना मारहाण करुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी रुद्रपूरचे भाजप आमदार राजकुमार ठुकराल यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपने रविवारी आ. ठुकराल यांना नोटीस दिली असून, दहा दिवसांत उत्तर मागितले आहे.
अल्पवयीन मुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर या दोन कुटुंबांना एकत्र बोलावून यावर चर्चा करण्यासाठी आमदारांनी आपल्या घरी ९ मार्च रोजी बैठक बोलाविली होती. त्या बैठकीनंतर मुलाचे वडील राम किशोर यांनी आरोप केला आहे की, आ. ठुकराल यांनी आपल्याला, पत्नी माला, मुलगी पूजा व सोनम यांना मारहाण केली व अपशब्द वापरले. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठुकराल यांच्यावर जाणीवपूर्वक अपमान करणे, अपशब्द वापरणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. आ. ठुकराल यांनी सांगितले की, मुलगा आणि मुलीच्या घरचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. यावेळी या दोन्ही कुटुंबात मारहाण सुुरू झाल्याने त्यांना आवरण्यासाठी मी हस्तक्षेप केला. व्हिडीओतही हे तुम्ही पाहू शकता.