दलित तरुणास पोलीस ठाण्यात मूत्र पिण्यास भाग पाडले, तरुणाचा पोलिसावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:06 AM2021-05-24T06:06:20+5:302021-05-24T06:06:52+5:30
Crime News: मला पोलीस उपनिरीक्षकाने मूत्र पिण्यास भाग पाडले, असा आरोप कर्नाटकमधील चिकमगलुरुत दलित तरुण पुनीत (२२) याने केला आहे. त्याला १० मे रोजी अटक झाली
हैदराबाद : पोलिसांच्या ताब्यात असताना, मला पोलीस उपनिरीक्षकाने मूत्र पिण्यास भाग पाडले, असा आरोप कर्नाटकमधील चिकमगलुरुत दलित तरुण पुनीत (२२) याने केला आहे. त्याला १० मे रोजी अटक झाली होती. एका जोडप्याला त्रास दिल्याचा गावकऱ्यांनी पुनीतवर आरोप करून त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
पुनीत याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून हे प्रकरण सांगितले आणि उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी केली. प्रसारमाध्यमांतील बातम्यांनुसार पुनीतने म्हटले की, “मला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसाने मला अनेक तास मारहाण केली. मी पिण्यासाठी पाणी मागितल्यावर आरोपी उपनिरीक्षकाने मला पाणी देण्यास नकार दिला. त्यानंतर, उपनिरीक्षकाने लॉकअपमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला माझ्या अंगावर लघवी करण्यास सांगितले आणि मला ते मूत्र पिण्यास भाग पाडले.”
पुनीतने म्हटले की, चोरीच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या चेतनने लघवी करण्यास नकार दिल्यावर, उपनिरीक्षकाने त्याला धमकी दिली की, जर तू सांगितले तसे केले नाही, तर तुझा छळ केला जाईल.
आरोप काय?
पुनीतने आरोप केला की, “पोलीस उपनिरीक्षकाने माझ्यावर जमिनीवर पडलेल्या मुत्राच्या थेंबांना तोंड लावण्यासाठी दबाब आणला. त्यानंतर, मला शिवीगाळ करून माझ्यावर खोटी माहिती देण्यासाठीही दबाब आणला.”
ही घटना समोर आल्यानंतर चिकमगलुरुच्या पोलीस अधीक्षकांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आणि पुनीतचेही म्हणणे नोंदवून घेतले. आरोपी उपनिरीक्षकाची पोलीस स्थानकातून बदली केली आहे.