यूपीत रामायण पठणाच्या कार्यक्रमात दलितांना मंदिरात प्रवेश नाही;मंदिर पुजाऱ्याने काढली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 09:35 AM2017-08-23T09:35:44+5:302017-08-23T09:44:36+5:30
उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे.
कानपूर, दि. 23- उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठ दरम्यान दलितांना त्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचं सांगण्यात आलं आहे. या गावातील मंदिराच्या बाहेर तशी नोटीसही लावण्यात आली आहे. रामायण पठणाच्या काळात दलित व्यक्तीला मंदिर प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली असून तशी नोटीसच लावण्यात आली आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या या धक्कादायक नोटीसीमुळे तेथिल दलित लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दलित नकारात्मक भावना घेऊन येतात असा समज असल्याने गावात कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं जातं, असं या गावातील दलितांनी सांगितलं आहे. गावातील जानकी मंदिरच्या पुजाऱ्यानेच आम्हाला रामायण पाठच्या काळात दहा दिवस घरातून बाहेर न पडण्याचे फर्मान बजावलं असल्याचं या गावकऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.
आम्ही सोमवारी राम जानकी मंदिरात रामायण पठणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. पण मंदिरात प्रवेश करताना आम्हाला प्रवेशद्वारावर लावलेली नोटीस वाचायला लावली. त्यामध्ये रामायण पठणाच्या दहा दिवसात दलितांनी मंदिरात येऊ नये, असं म्हंटलं होतं. पूजाऱ्याने लावलेली ती नोटीस पाहून आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया गावातील एका महिलेने दिली आहे. गावातील या महिलेने पुजाऱ्याच्या या निर्णयाची निंदा केली आहे. या गावात दलित लोकसंख्या जास्त आहे. पण या पुजाऱ्याने आम्हाला रामायण पठणासाठी बंदी घातली आहे. आम्ही जेव्हा या विषयी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला धकावल्याचंही या महिलेने सांगितलं आहे.
दलितांना मंदिर प्रवेशास मनाई करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही, असं स्थानिक रहिवाशी गुरू प्रसाद आर्य यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून त्यात पुजाऱ्याचा हात असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उपविभागीय दंडाधिकारी सुरेश कुमार यांनी दिली आहे.