इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 05:31 PM2021-02-13T17:31:19+5:302021-02-13T17:33:43+5:30
Ravishankar Prasad in Rajya sabha : भाजप खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी दिलं स्पष्टीकरण
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत मोठं वक्तव्य केलं. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ देण्यात येणार नाही. तसंच अनुसुचित जातींसाठी आरक्षित असलेल्या लोकसभेच्या अथवा राज्यसभेच्या जागांवरूनही त्यांना निवडणुका लढवता येणार नसल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत दिली. तसंच गुरूवारी प्रसाद यांनी राज्यसभेत ट्विटरसहित अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना इशाही दिला होता.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना अन्य आरक्षित जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी असलेल्या पात्रतेबाबत प्रश्न विचारला होता. "ज्या लोकांनी हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे ते अनुसुचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवरुन निवडणुका लढवू शकतात. याव्यतिरिक्त या धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल," असंही प्रसाद म्हणाले. "संविधान (अनुसुचित जाती) आदेश, पॅरा ३ अनुसुचित जातींची राज्यवार सूचींची व्याख्या सांगते. या अंतर्गत कोणताही व्यक्ती हिंदू, शीख अथवा बौद्ध धर्मापेक्षा वेगळ्या धर्माचा स्वीकार करतो तो अनुसुचित जातीचा सदस्य मानला जाणार नाही. वैध अनुसुचित जातीच्या प्रमाणपत्रासोबत कोणतीही व्यक्ती आरक्षित असलेल्या जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी पात्र आहे," असं उत्तर प्रसाद यांनी आरक्षित क्षेत्रावरून निवडणुका लढवण्याच्या प्रश्नावर दिलं.
"सरकार लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि निवडणुकीच्या नियमांमध्ये काही दुरूस्ती करण्याचा विचार करत आहे का, ज्यात स्पष्टपणे ख्रिस्ती आणि इस्लाम हा धर्म स्वीकारणाऱ्यांना दलित आरक्षित जागांवरुन निवडणूक लढण्यासाठी पात्र नसतील," असा सवालही जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सरकारला विचारला. यावर उत्तर देताना सहकारनं नाही असं म्हणत असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही स्पष्ट केलं.