नुकसान भरून काढणे शक्य; पण जीवितहानी नाही - ली ब्रानस्टेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:55 AM2021-06-06T07:55:10+5:302021-06-06T07:55:56+5:30
Lee Branstator : कार्नेगी मेलन विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रानस्टेटर यांनी आशियाच्या परिदृश्यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक संस्थांचा अभ्यास केला आहे.
- अंकिता देशकर
नागपूर : भारतीय अर्थव्यवस्था दुप्पट अंकी दराने वाढेल असे कधी झाले नाही. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११.५ टक्के वाढ होईल या निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत ८ ते ९ टक्क्यांनी जीडीपी वाढेल अशी शक्यता अनेक अर्थतज्ज्ञ व मूल्यांकन संस्थांनी व्यक्त केली आहे. कोरोना महामारीने झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल; पण जीवितहानी भरून काढणे शक्य नाही, असे मत अर्थशास्त्राचे प्राध्यापक ली ब्रानस्टेटर यांनी व्यक्त केले.
कार्नेगी मेलन विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रानस्टेटर यांनी आशियाच्या परिदृश्यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक संस्थांचा अभ्यास केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी महामारीच्या काळात खालावलेल्या आर्थिक घडामोडींवर प्रकाश टाकला. त्यांनी चीनचे उदाहरण दिले. चीन हे कोरोनाचे उगमस्थान होते. जगभरातून टीका होत असली तरी चीन सरकारने देशावरील संकट प्रभावीपणे निस्तारले. ब्रानस्टेटर म्हणाले, यावेळी लस ही आर्थिक विकासाची चावी आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची अर्थव्यवस्था यावर्षी ५ टक्क्यांनी वाढेल.
महामारीतून धडा घेणे आवश्यक
भारतासारख्या विकसनशील देशाबाबत बोलताना ब्रानस्टेटर म्हणाले, जागतिक जीडीपीमध्ये अशा देशांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे अशा विकसनशील देशांची संथ गतीने वाढ आणि आर्थिक मंदी जगावर परिणाम करणारी असते. अशा अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होईल. जागतिक समुदायाने या महामारीतून धडा घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांचा इशारा लक्षात घेऊन आधीच सावध राहणे गरजेचे आहे. भविष्यातील अर्थव्यवस्था ही भूतकाळाच्या परिस्थितीप्रमाणे तंतोतंत राहील ही शक्यता गृहीत धरू नये.