तिसऱ्या दिवशीही धरणे, बहिष्कार, घोषणाबाजी

By admin | Published: August 6, 2015 10:50 PM2015-08-06T22:50:47+5:302015-08-06T22:50:47+5:30

काँगे्रसच्या २५ खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांनी गुरुवारी तिसऱ्या दिवशीही एकजुटीने बहिष्कार, सभात्याग आणि धरणे देत

Damages, excommunication, slogan for the third day | तिसऱ्या दिवशीही धरणे, बहिष्कार, घोषणाबाजी

तिसऱ्या दिवशीही धरणे, बहिष्कार, घोषणाबाजी

Next

नवी दिल्ली : काँगे्रसच्या २५ खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांनी गुरुवारी तिसऱ्या दिवशीही एकजुटीने बहिष्कार, सभात्याग आणि धरणे देत मोदी सरकारविरुद्धचा आपला रोष व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसजनांनी संसदेबाहेर धरणे देत, मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सोनियांनी नागा शांतता करारावरून मोदींना लक्ष्य करीत, त्यांना अहंकारी संबोधले.
काँग्रेस खासदारांच्या निलंबनाविरोधात सलग तिसऱ्या दिवशीही बहुतांश विरोधी पक्षांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे, सपा, राजद सदस्यांनी सभात्याग केला, तर तृणमूल काँग्रेस, जदयु आदी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. लोकसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी, डावे, सपा, राजद सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. प्रश्नोत्तराच्या तासात आपला मुद्दा मांडण्याची मागणी त्यांनी पुढे रेटली. मात्र लोकसभाध्यक्षांनी त्यास नकार दिला. यानंतर या तिन्ही पक्षांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.
राज्यसभेतही निलंबनाच्या मुद्यावरून काँग्रेस सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळेच्या स्थगितीनंतर दुपारी २ वाजता संपूर्ण दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावरील अतिरेकी हल्ल्यावर स्वत:हून निवेदन दिले. काँग्रेस सदस्यांनी ते शांतपणे ऐकले. मात्र ते संपताच गोंधळ व घोषणाबाजी करून सभागृह डोक्यावर घेतले. सपा,जदयु व डाव्या पक्षांच्या सदस्यांनीही त्यांना साथ दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Damages, excommunication, slogan for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.