‘गोमांस’च्या संशयावरून दाम्पत्यास रेल्वेत मारहाण
By Admin | Published: January 16, 2016 02:26 AM2016-01-16T02:26:26+5:302016-01-16T02:26:26+5:30
रेल्वेत सापडलेल्या बेवारस पिशवीत मटण आढळल्यानंतर एका दाम्पत्याला त्यांच्याजवळ गोमांस असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या हरदापासून
हरदा : रेल्वेत सापडलेल्या बेवारस पिशवीत मटण आढळल्यानंतर एका दाम्पत्याला त्यांच्याजवळ गोमांस असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या हरदापासून ३० कि.मी.वर असलेल्या खिकिया स्थानकावर १३ जानेवारीला घडली. दाम्पत्याला मारहाण करणारे लोक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
मोहम्मद हुसैन (४३) व त्यांची पत्नी नसीम बानो (३८) हे कुशीनगर एक्स्प्रेसने गोरखपूरला जात असताना गोरक्षा समितीच्या दोन सदस्यांनी त्यांचे सामान तपासण्याचा प्रयत्न केला. हुसैन यांच्याजवळच्या पिशवीत गोमांस असल्याचा या कार्यकर्त्यांचा संशय होता. हुसैन यांनी पिशवी तपासण्यास मनाई केल्यावर या दोघांना मारहाण करण्यात आली. यानंतर हुसैन यांनी नातेवाईकांना बोलावून घेतले. दरम्यान गोरक्षा समितीचे अन्य कार्यकर्तेही आले आणि दोन गटात संघर्ष उडाला. गोरक्षा समितीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली. त्याआधी कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये बेवारस पिशवीत मटण आढळून आले होते. हे गोमांस असल्याचा संशय होता. पण ते म्हशीचे मांस असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खंडवा स्थानकावरून रेल्वेत चढलेल्या दहा-बारा लोकांनी प्रवाशांच्या बॅग तपासण्याचा सपाटा लावला होता. (वृत्तसंस्था)