खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:55 PM2024-09-18T16:55:23+5:302024-09-18T17:08:24+5:30

Delhi-Mumbai Expressway news: एक्सप्रेस वेचच्या दौसा भागातील भांडारेज टोलजवळ अचानक रस्ता खचला आहे. यामुळे तिथे मोठा खड्डा पडला आहे. माहिती मिळताच तातडीने बॅरिकेड्स लावून खड्डा बुजविण्यात आला.

Dams infested with crabs, rats infested Delhi-Mumbai Expressway; Cars started flying in the air Rajasthan's Dausa caves in | खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या

खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या

देशातील महामार्गांच्या कामाची अवस्था केविलवाणी आहे. मुंबई-गोवा महामार्ग तर गेली १५ वर्षे हजारो कोटी खर्चून बांधला जात आहे. तो काही संपण्याचे नावच घेत नाहीय. आठ महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या अटल सेतूवर खड्डे पडले आहेत. डांबराची ठिगळे मारून त्यावरून गाड्या धावत आहेत. अशातच देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेबाबत धक्कादायक माहिती येत आहे. 

या एक्सप्रेस वेचच्या दौसा भागातील भांडारेज टोलजवळ अचानक रस्ता खचला आहे. यामुळे तिथे मोठा खड्डा पडला आहे. माहिती मिळताच तातडीने बॅरिकेड्स लावून खड्डा बुजविण्यात आला. हा खड्डा का पडला याचा तपास केला असता उंदीर किंवा तत्सम जीवाच्या बिळामुळे पावसाचे पाणी तिथे साठले आणि रस्ता खचला. आता महाराष्ट्रातही असा हास्यास्पद प्रकार काही वर्षांपूर्वी समोर आला होता.

चिपळुणातील तिवरे धरण २०१९ च्या जुलैमध्ये फुटले होते. तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचे फडणवीसांचे सरकार होते. हे धरण का फुटले याचे कारण सरकारने दिले होते. याची खूप चर्चा झाली होती. खेकड्यांनी तिवरे धरण फोडल्याचा तर्क तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी काढला होता. आता सरकारने हा दावा केल्याने तो खराच असणार. त्यामुळे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे उंदरांनी पोखरला हा देखील तर्क खरा मानण्याशिवाय सामान्य नागरिकांकडे गत्यंतर नाही. हा खड्डा १० फूट एवढा मोठा होता. एक्स्प्रेस हायवे उंदरांच्या बिळामुळे पोखरला गेल्याचे वृत्त आजतकने दिले आहे.

 एकंदरीतच हा दावा किती खरा आणि कीती खोटा याबाबत आताच काही सांगता येत नाहीय. प्रशासनाने खड्डा बुजविला आहे. तो भाग सध्या बंद ठेवण्यात आला आहे. हा खड्डा कसा पडला याचा शोध घेण्यासाठी एनएचएआयचे डिझाईन विभागाचे इंजिनिअरही दिल्लीहून तातडीने दौसाला पोहोचले आहेत. 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेवर काही दिवसांपासून वेगाने येत असलेल्या गाड्या उंच-सखलपणामुळे म्हणजेच मध्येच रस्ता खाली गेल्याने सिनेमात दाखवितात तसे हवेत उडताना आणि पुन्हा रस्त्यावर खालून घासताना ठिणग्या उडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे १२० किमी वेगाच्या या एक्स्प्रेस वेचे काम किती वेगाने, किती क्वालिटीचे झाले असेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. 
 

Web Title: Dams infested with crabs, rats infested Delhi-Mumbai Expressway; Cars started flying in the air Rajasthan's Dausa caves in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.