नृत्यांगना मृणालिनी साराभाई कालवश
By admin | Published: January 22, 2016 02:42 AM2016-01-22T02:42:25+5:302016-01-22T02:42:25+5:30
भरतनाट्यम, कथकली आणि मोहिनीअट्टम या तिन्ही शास्त्रीय नृत्यप्रकारांत अचंबा वाटावे असे नैप्युण्य असलेल्या महान नृत्यांगना मृणालिनी साराभाई
अहमदाबाद : भरतनाट्यम, कथकली आणि मोहिनीअट्टम या तिन्ही शास्त्रीय नृत्यप्रकारांत अचंबा वाटावे असे नैप्युण्य असलेल्या महान नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ९७ व्या वर्षी येथे निधन झाले. पूर्वीच्या कर्मठ समाजात मंदिरांमधील देवदासींपुरती मर्यादित राहून हिनतेने पाहिली जाणारी नृत्यकला कलामंचांवर सन्मानाने प्रस्थापित करण्याचे महान कार्य करणाऱ्या या विदुषीच्या निधनाने कलाक्षेत्राची हानी झाली. भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची पताका जगभर फडकत ठेवण्यासाठी ‘अम्मा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणालिनी साराभाई यांनी आयुष्याची आठ दशके वेचली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ‘माझी आई मृणालिनी अनंतकालीन नृत्यासाठी आत्ताच निघून गेली’,असा संदेश सोशल मीडियावर टाकून त्यांच्या कन्या व थोर नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी ही निधनवार्ता जगाला दिली. मृणालिनी यांनी साठ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘दर्पण’ नृत्यशाळेपासून अंत्ययात्रा निघाल्यावर सायंकाळी त्यांच्यावर साश्रु नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वृत्तसंस्था)