दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा - नरेश अग्रवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 02:13 PM2017-08-01T14:13:08+5:302017-08-01T14:18:06+5:30
समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली, दि. 01 - राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी विषयी मुद्दा आज पुन्हा संसदेत मांडण्यात आला. समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना संसदेच्या सभागृहात यायचे नसेल, तर ते आपल्या खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. याचबरोबर ते म्हणाले, बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेल्या विजय माल्ल्याची जशी राज्यसभा खासदारकी रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा. दरम्यान, नरेश अग्रवाल यांच्या आधी सुद्धा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या गैरहजेरीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता.
सचिन तेंडुलकरला 2012 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून संसदेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने एप्रिल 2017 पर्यंत म्हणजे 348 दिवसांत फक्त 23 वेळा राज्यसभेत हजरी लावली आहे. तर, अभिनेत्री रेखा यांना सुद्धा 2012 मध्येच खासदार म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांची एप्रिल 2017 पर्यंत उपस्थिती फक्त 18 दिवसांची आहे. तसेच, त्या दोघांच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत आहे.