झेलमने ओलांडली धोक्याची पातळी
By admin | Published: April 7, 2017 04:43 AM2017-04-07T04:43:29+5:302017-04-07T04:43:29+5:30
झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यात वाढ झाल्याच्या कारणाने राज्य सरकारने मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा गुरुवारी दिला
श्रीनगर : झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यात वाढ झाल्याच्या कारणाने राज्य सरकारने मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा गुरुवारी दिला आहे. झेलम नदीने अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे १८ फुटांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. तीन वर्षांपूर्वी झेलमच्या पुराने काश्मीरचे काही कोटी रुपयांचे नुकसान झाले होते आणि मोठी मनुष्यहानीही झाली होती.
या इशाऱ्यानंतर काही गावकऱ्यांनी स्वत:हूनच अन्यत्र स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. त्यातच ठिकठिकाणी बर्फवृष्टी होत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
गेल्या तीन दिवसांत खोऱ्यातील उंचावरील भागात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. काश्मीर खोऱ्यात पुन्हा बर्फवृष्टी झाल्यामुळे दरडी कोसळल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी बंद करण्यात आला. रविवारपर्यंत शाळाही बंद ठेवल्यात आल्या
आहेत.