नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 07:36 AM2018-08-30T07:36:46+5:302018-08-30T07:39:30+5:30

१५.४१ लाख कोटी बाद केले; १५.३१ लाख कोटी परत आले, नव्या नोटांसाठी १२,८७७ कोटी रुपयांचा खर्च

Dangerious figures after 1 years, demonetization | नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

Next

मुंबई : नोटाबंदीवेळी चलनातून बाद केलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये बँकेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी एकूण १७.९७ लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपयांच्या होत्या. यातील ३ लाख कोटी रुपये ‘काळा पैसा’ असल्याचे सांगून ती रक्कम चलनात येणार नाही असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने तो फोल ठरला आहे.

नोटाबंदीनंतर (नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७) रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले. २०१७-१८ मध्येही रिझर्व्ह बँकेला नोटांच्या छपाईपोटी ४,९१२ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजे १२,८७७ कोटी रुपयांचा नव्या नोटांसाठी खर्च आला आहे. रिझर्व्ह बँकेने या अहवालात महागाई दरात वाढीची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१८-१९ च्या अखेरीस महागाई दर ४.९ टक्के व २०१९-२० च्या सुरूवातीला ५ टक्क्यांवर जाईल. तसेच आर्थिक विकास दर (जीडीपी) ६.७ वरुन ७.४ पोहोचला आहे.

निश्चलीकरण फेल

नोटाबंदीतील ३ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नाहीत, असा दावा केंद्र सरकारने केला होता. वास्तवात सर्व रक्कम परत आली व निश्चलीकरण फक्त १३ हजार कोटी रुपयांचे झाले, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या अयशस्वी नोटाबंदीमुळे देशाचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. १०० नागरिकांना प्राण गमवावे लागले. हजारो छोटे उद्योग बंद पडले. १५ कोटींचा रोजगार बुडाला, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

99.30%
रक्कम बँकेत परत

Web Title: Dangerious figures after 1 years, demonetization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.