बंद मोटारीत गुदमरून जुळ्या बहिणींचा मृत्यू
By admin | Published: June 16, 2017 03:47 AM2017-06-16T03:47:17+5:302017-06-16T03:47:17+5:30
घराशेजारच्या मोकळ्या शेतजमिनीत उभ्या करून ठेवलेल्या नादुरुस्त मोटारीत खेळण्यासाठी गेल्या असता मोटारीचे दरवाजे चुकून ‘आॅटो लॉक’ होऊन हर्षिता
गुरूग्राम : घराशेजारच्या मोकळ्या शेतजमिनीत उभ्या करून ठेवलेल्या नादुरुस्त मोटारीत खेळण्यासाठी गेल्या असता मोटारीचे दरवाजे चुकून ‘आॅटो लॉक’ होऊन हर्षिता आणि हर्षा या साडेपाच वर्षांच्या जुळ्या बहिणींचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथून १६ किमी अंतरावर असलेल्या जमालपूर गावात घडली.
हर्षिता, हर्षा, त्यांची आई कीर्ती व त्यांचा अडीच वर्षांचा धाकटा भाऊ असे सर्व जण ९ जून रोजी जमालपूर येथे त्यांच्या आजोळी आल्या होत्या. त्यांच्या अजोबांच्या घरापासून जवळच मोकळ्या शेतजमिनीत एक मोटार उभी करून ठेवलेली होती. हर्षिता व हर्षा खेळत-खेळत मोटारीजवळ गेल्या व दरवाजा उघडून आत चढल्या. मोटारीचे दरवाजे लागले व ‘आॅटो लॉक’ झाले. मोटार उघड्यावर रणरणत्या उन्हात उभी होती. काही वेळाने या दोघी मोटारीत गुदमरल्या.
मुली कुठे गेल्या याचा शोध घेत आजोळच्या घरचे लोक आले, तेव्हा त्यांना मोटारीच्या पुढच्या सीटवर हर्षिता व मागच्या सीटवर हर्षा बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. जुनी, नादुरुस्त मोटार कित्येक महिने तेथे गंजत पडलेली होती. त्यामुळे ‘आॅटो लॉक’ झालेले तिचे दरवाजे व काचा बाहेरून उघडेनात. शेवटी काचा फोडून दोघींना बाहेर काढले व इस्पितळात नेले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हर्षिता व हर्षाचे वडील गोविंद कुमार भारतीय लष्करात जवान आहेत व त्यांचे मेरठला पोस्टिंग आहे. त्यांनी मुलांना व पत्नीला आजोळी पाठविले होते व बुधवारी तेही घरी येणार होते. मेरठमध्ये त्यांनी दोन्ही मुलींना इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता व शाळा सुरू होणार असल्याने ते त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते. (वृत्तसंस्था)
हर्षिता व हर्षा या आमच्या कुटुंबाचा जीव की प्राण होत्या. जुळ्या असल्याने दोघी नेहमी एकत्र खेळत असत. त्या हे जगही असे एकत्रपणे सोडून जातील, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. गुरुवारी त्यांना पहिल्या दिवशी शाळेत जायचे होते. पण त्याआधीच त्या आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
- कंवर सिंग,
हर्षिता व हर्षाचे आजोबा