देवभूमीमध्ये मृत्यू दारात; हिमाचल प्रदेशात ९ हजार घरांना तडे; ११ हजार लोकांना हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:09 PM2023-08-20T13:09:13+5:302023-08-20T13:09:21+5:30
मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे हिमाचल प्रदेशात घरांना तडे
नवी दिल्ली: मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे हिमाचल प्रदेशात नऊ हजार घरांना तडे गेले असून, ११ हजार लोकांनी घरे सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतला आहे. उत्तराखंडमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, देशभरात पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. प्राप्त माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे घरांचे अधिक नुकसान झाले आहे. हजारो घरे कधीही पडू शकतील, अशा स्थितीत आहेत. त्यामुळे लोक सुरक्षितस्थळी आश्रय घेत आहेत. राज्यातील १२ पैकी ११ जिल्ह्यातील रस्ते बंद आहेत.
४,२८५ ट्रान्सफाॅर्मर आणि ८८९ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. राज्यात दहा हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, आणखी नऊ जिल्ह्यांना पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनी ही माहिती शनिवारी दिली. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे रविवारी आपले गृहराज्य हिमाचल प्रदेशला सोमवारी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेणार आहेत. आतापर्यंत राज्यात ७७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. (वृत्तसंस्था)
राजस्थान सरकारची १५ काेटींची मदत
आपद्ग्रस्त हिमाचल प्रदेशला राजस्थान सरकारने १५ कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले आहे. इतरही अनेक प्रकारची मदत देऊ केली आहे. हिमाचल प्रदेशातील सिमलामधील समरहिल येथे सलग सहाव्या दिवशी बचावकार्य सुरू राहिले. येथील शिवमंदिर दुर्घटनेत १६ मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत.
१७ राज्यांत हवामान खात्याकडून अलर्ट
आगामी २४ तासांत देशातील १७ राज्यांत पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने शनिवारी म्हटले. उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, सिक्किम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत मुसळधार; तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तेलंगना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
- पंजाबातील सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे ५० शेतकऱ्यांना पुरातून बाहेर काढण्यात आले. आरजी पूल तुटल्यामुळे १५ गावांचा संपर्क तुटला आहे. ५० गावांना पुराचा फटका बसला आहे.
- उत्तराखंडमधील तोताघाटीत भूस्खलन झाले. त्यामुळे एनएच-५८ ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला. हरियाणातील दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर पाणी साठले आहे.
- मध्य प्रदेशातील जबलपूर, शहडोल, रिवा आणि सागर भागात २ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. भोपाळ, इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर-चंबळ भागातील जिल्ह्यांतही पाऊस सक्रिय आहे.
- छत्तीसगडच्या राजनांदगाव, कवर्धा आणि मुंगेली येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायपूरमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला.
- झारखंडमध्ये दुष्काळसदृश स्थिती असून, आठ जिल्ह्यातील वहितीखालील ८० टक्के जमिनीवर पुरेशा पावसाअभावी पेरणी होऊ शकलेली नाही.